IND vs ENG : कर्णधार शुबमनने दादागिरी संपवली, सौरव गांगुलीला पछाडलं, गिलची खास कामगिरी
Shubman Gill Eng vs IND 1st Test Day 2 : शुबमन गिल याने इंग्लंड विरुद्ध कसोटी कर्णधार म्हणून शानदार पदार्पण केलं. गिलने 147 धावांच्या खेळीसह माजी कर्णधार सौरव गांगुलीचा रेकॉर्ड ब्रेक केला.

इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिला कसोटी सामना हेडिंग्ले लीड्समध्ये खेळवण्यात येत आहे. शुबमन गिल याने कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करत शतकी खेळी केली. शुबमनने 147 धावांची खेळी केली. टीम इंडियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 359 धावा केल्या होत्या. तर शुबमन 127 धावांवर नाबाद परतला. तर शुबमनला दुसऱ्या दिवशी फक्त 20 धावाच जोडता आला. शुबमन 147 धावा करुन आऊट झाला. शुबमनची ही कसोटीतील सर्वोच्च धावसंख्या ठरली. शुबमनने यासह कसोटी कारकीर्दीत अविस्मरणीय कामगिरी केली आणि मानाच्या यादीत स्थान मिळवलं.
माजी कर्णधार सौरव गांगुलीला पछाडलं
शुबमन गिल याने कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सौरव गांगुलीला मागे टाकलंय. गांगुलीने 2002 साली इंग्लंडमध्ये याच मदैानात कर्णधार म्हणून शतक केलं होतं. गांगुलीने आजपासून 23 वर्षांपूर्वी 128 धावा केल्या होत्या. तर शुबमनने 147 धावांसह या यादीत चौथं स्थान पटकावलं आहे. टीम इंडियाकडून कर्णधार म्हणून इंग्लंड विरुद्ध एका डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोहम्मद अजहरुद्दीन याच्या नावावर आहे. अजहरुद्दीनने 1990 साली मँचेस्टरमध्ये 179 धावांची खेळी केली होती.
इंग्लंडमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करणारे भारतीय कर्णधार
मोहम्मद अझहरुद्दीन : 179 धावा, 1990
विराट कोहली : 149 धावा, 2018
मन्सूर अली खान पतौडी : 148 धावा ,1967
शुबमन गिल : 147 धावा, 2025
सौरव गांगुली : 128 रन्स, 2002
भारताच्या पहिल्या डावात 471 धावा
भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या. टीम इंडियासाठी शुबमन व्यतिरिक्त ओपनर यशस्वी जयस्वाल आणि उपकर्णधार ऋषभ पंत या दोघांनी शतकी खेळी केली. यशस्वी जयस्वाल याने 101 तर पंतने 134 धावा केल्या. तसेच केएल राहुल याने 42 धावांचं योगदान दिलं. मात्र या व्यतिरिक्त भारताकडून एकालाही काही खास करता आलं नाही. त्यामुळे भारताला 500 पार पोहचता आलं नाही.
इंग्लंडचा पहिला डाव
दरम्यान इंग्लंडने पहिल्या डावात दुसऱ्या सत्रापर्यंत 24 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 107 धावा केल्या. इंग्लंडने यासह सलग दुसरं सत्रही आपल्या नाववर केलं. इंग्लंडकडून बेन डकेट आणि ओली पोप ही जोडी नाबाद परतली. डकेट 76 बॉलमध्ये 53 रन्सवर नॉट आऊट आहे. तर ओली पोपने 63 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या आहेत. भारताकडून जसप्रीत बुमराह याने एकमेव विकेट घेतली. मात्र बुमराहला दुसऱ्या बाजूने चांगली साथ मिळाली नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांना गोलंदाजांकडून तिसऱ्या आणि अंतिम सत्रात जास्तीत जास्त विकेट्सची अपेक्षा असणार आहे.
