ऋषभ पंतनंतर या फलंदाजाचा कारनामा, सलग दुसऱ्या टेस्टमध्ये शतकी धमाका
Test Cricket : टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंत याने इंग्लंड विरुद्ध उपकर्णधार म्हणून पदार्पणात दोन्ही डावात शतक करत मोठा कारनामा केला. त्यानंतर आता श्रीलंकेच्या युवा फलंदाजाने कसोटीत बांगलादेश विरुद्ध सलग दुसरं शतक झळकावलं आहे.

टी 20नंतर टेस्ट क्रिकेटचा थरार पाहायला मिळत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशीप 2025-2027 या साखळीला सुरुवात झाली आहे. या साखळीत आतापर्यंत वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया, श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आणि इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात कसोटी सामने खेळवण्यात येत आहेत. क्रिकेट चाहत्यांचं लक्ष हे सध्या इंडिया विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिजकडे लागून आहे. तर श्रीलंका मायदेशात बांगलादेश विरुद्ध दुसरा आणि अंतिम कसोटी सामना खेळत आहे. उभयसंघातील पहिला सामना हा अनिर्णित राहिला.त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिकाही आपल्या नावावर करण्याची दोन्ही संघांना संधी आहे. त्यामुळे दोन्ही संघात चढाओढ आहे.
टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंत याने इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटीतील दोन्ही डावात शतक करुन इतिहास घडवला. त्यांनतर आता श्रीलंकेच्या युवा फलंदाजाने सलग दुसरं शतक झळकावलं आहे. श्रीलंकेचा युवा फलंदाज पाथुम निसांका याने ही कामगिरी केली आहे. मात्र पाथुमने सलग 2 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. तर पंतने एकाच सामन्यात दोन्ही डावात शतक केलं होतं.
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला 17 जूनपासून सुरुवात झाली. सलामीचा सामना गॉलमध्ये खेळवण्यात आला. दोन्ही संघांनी जोरदार कामगिरी केली. त्यामुळे सामना अनिर्णित राहिला या सामन्यात पाथुमने अविस्मरणीय खेळी केली. पाथुमने 187 धावा केल्या. पाथुमने हाच धमाका दुसर्या कसोटीतही कायम ठेवत आणखी एक शतक ठोकलं.
पाथमुने कोलंबोत सामन्यातील दुसऱ्या दिवशी 26 जून रोजी शतक झळकावलं. पाथुमने 18 व्या कसोटी सामन्यात चौथं शतक केलं. पाथुमच्या शतकामुळे श्रीलंकेला दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 43 धावांची आघाडी मिळाली. श्रीलंकेने 2 विकेट्स गमावून 78 ओव्हरमध्ये 290 रन्स केल्या. तर पाथुम 146 धावांवर नाबाद परतला. पाथुमने या खेळीत 238 चेंडूंचा सामना करत 18 चौकार लगावले.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, श्रीलंकेकडे 43 धावांची आघाडी
A second successive Test ton for Pathum Nissanka 👏#SLvBAN 📝: https://t.co/FHsRZhIYpq pic.twitter.com/PbE09ZVg5y
— ICC (@ICC) June 26, 2025
दिनेश चांदीमल नर्व्हस नाईंटीचा शिकार
पाथुम व्यतिरिक्त अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार दिनेश चांदीमल यानेही योगदान दिलं. मात्र चांदीमलचं शतक अवघ्या 7 धावांनी हुकलं. दिनेशने 153 बॉलमध्ये 10 फोर आणि 1 सिक्ससह 93 रन्स केल्या. तर लहीरु उडारा याने 40 धावांचं योगदान दिलं. तसेच पाथुमसह प्रभात जयसूर्या नाबाद परतला. प्रभात 5 धावांवर नाबाद आहे.
