T20I World Cup 2026 : मुंबईकर खेळाडू टीम इंडिया विरुद्ध खेळणार! सामना कधी?
ICC T20 World Cup 2025 Team India Schedule : टीम इंडिया टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपला पहिलाच सामना हा मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये खेळणार आहे. हा सामना यूएसए टीममधील मुंबईकर खेळाडूसाठी खास ठरणार आहे.

टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. एका ट्रॉफीसाठी 20 संघांमध्ये चढाओढ असणार आहे. या स्पर्धेतील एकूण 55 सामने हे भारत आणि श्रीलंकेतील 7 शहरांमधील एकूण 8 स्टेडियममध्ये होणार आहेत. प्रत्येक गटात 5 संघ आहेत. प्रत्येक संघ साखळी फेरीत 4 सामने खेळणार आहे. साखळी फेरीत 3 सामने जिंकणारा संघ सुपर 8 मध्ये सहज पोहचेल. तर 2 सामने जिंकणाऱ्या संघाला इतर संघांच्या समीकरणावर अवलंबून रहावं लागणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत रस्सीखेच पाहायला मिळणार, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या निमित्ताने भारतीय संघाचं वेळापत्रक जाणून घेऊयात.
टीम इंडिया कोणत्या ग्रुपमध्ये?
टीम इंडिया ए ग्रुपमध्ये आहे. टीम इंडिया व्यतिरिक्त नेदरलँड्स, नामिबिया, पाकिस्तान आणि यूएसए क्रिकेट संघाचा समावेश आहे. टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी फेरीत दररोज 3 सामने होणार आहेत. स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.तर 8 मार्चला 55 व्या सामन्याच्या निकालानंतर वर्ल्ड कप विजेता निश्चित होणार आहे.
टीम इंडियाचा पहिला सामना मुंबईत
टीम इंडिया वर्ल्ड कप स्पर्धेत सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात खेळणार आहे. भारतीय संघ या मोहिमेतील आपला पहिला सामना हा यूएएस विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 7 फेब्रुवारीला कॅप्टन सूर्याच्या होम ग्राउंडमध्ये होणार आहे. भारत विरुद्ध यूएसए हा सामना ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.
मुंबईचा खेळाडू टीम इंडिया विरुद्ध खेळणार
वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्यात मुंबईकर खेळाडूला संधी मिळाल्यास तो टीम इंडिया विरुद्ध खेळताना दिसणार आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून मराठमोळा सौरभ नेत्रावळकर आहे. यूएसएस टीमममध्ये अनेक मुंबईकर खेळाडू आहेत. सौरभ व्यतिरिक्त हरमीत सिंह आणि शुभम रांजने हे मुंबईसाठी खेळलेले खेळाडू आता यूएसएचं प्रतिनिधित्व करत आहेत. सौरभ आणि हरमीत दोघेही 2024 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध खेळले होते. त्यामुळे या तिघांना संधी मिळाल्यास ते टीम इंडिया विरुद्ध आपल्या घरच्या मैदानात खेळताना दिसणार आहेत.
