Ravindra Jadeja चं विक्रमी शतक, नंबर 1 ऑलराउंडरकडून धोनीचा रेकॉर्ड ब्रेक
India vs West Indies 1st Test Day 2 : रवींद्र जडेजाने वेस्ट इंडिज विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवशी ध्रुव जुरेल याच्यासह पाचव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. जडेजाने या दरम्यान कारकीर्दीतील सहावं शतक झळकावत धोनीचा रेकॉर्ड ब्रेक केला.

आयसीसी टेस्ट रॅकिंगमधील नंबर 1 ऑलराउंडर रवींद्र जडेजा याने वेस्ट इंडिज विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी 3 ऑक्टोबरला जबरदस्त खेळी करत शतक ठोकलं. जडेजाचं हे 2025 वर्षातील दुसरं आणि कारकीर्दीतील एकूण सहावं कसोटी शतक ठरलं. जडेजा यासह या कसोटी मालिकेत शतक करणारा एकूण आणि टीम इंडियाचा तिसरा फलंदाज ठरला. जडेजाआधी दुसऱ्याच दिवशी टीम इंडियासाठी ध्रुव जुरेल आणि केएल राहुल या दोघांनी शतक ठोकलं.
जडेजाने जोमेल वॉरिकॅन याने टाकलेल्या 126 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर एकेरी धाव घेतली. यासह जडेजाने शतक पूर्ण केलं. जडेजाने शतक पूर्ण केल्यानंतर नेहमीप्रमाणे बॅटने हवेत तलवारबाजी करत जल्लोष केला. जडेजाने शतकापर्यंत पोहचण्यासाठी 168 चेंडूंचा सामना केला. जडेजाने शतकी खेळीतील 100 पैकी 54 धावा या चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. जडेजाने 5 षटकार आणि 6 षटकार लगावले. जडेजाने यासह भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या 6 कसोटी शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. तसेच एका बाबतीत धोनीला मागे टाकलं.
धोनीचा रेकॉर्ड ब्रेक
जडेजाने शतकी खेळीत 5 षटकार ठोकले. जडेजा यासह महेंद्रसिंह धोनी याला मागे टाकत टीम इंडियासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारा तिसरा बॅट्समन ठरला. जडेजाच्या नावावर आता 80 सिक्सची नोंद झाली आहे. तर धोनीने कसोटी कारकीर्दीत 76 षटकार लगावले होते. धोनीने 8104 चेंडूंचा सामना केल्यानंतर त्याला 76 सिक्स लगावता आले होते. तर जडेजाने 7 हजार 213 चेंडू खेळल्यानंतर 80 षटकारांचा टप्पा गाठला
भारतासाठी सर्वाधिक षटकार
भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम हा संयुक्तरित्या माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग आणि ऋषभ पंत यांच्या नावावर आहे. सेहवाग आणि ऋषभ पंत या दोघांनी प्रत्येकी 90 षटकार लगावले आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्थानी माजी कर्णधार आणि फलंदाज रोहित शर्मा विराजमान आहे. रोहितने 88 षटका लगावले होते. तर आता जडेजाने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
पाचव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी
दरम्यान रवींद्र जडेजा आणि ध्रुव जुरेल या दोघांनी पाचव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 400 पार मजल मारता आली. जुरेल-जडेजा जोडीने पाचव्या विकेटसाठी 331 बॉलमध्ये 206 रन्सची पार्टनरशीप केली. ध्रुव 125 धावा केल्या. तर त्याआधी केएल राहुल याने 100 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे भारतासाठी एकाच दिवसात तिघांनी शतक करण्याची कामगिरी केली.
