IND vs WI : कॅप्टन शुबमनचा ‘दस का दम’, विंडीज विरुद्ध विक्रमी शतक, गौतम गंभीरचा रेकॉर्ड ब्रेक
Shubman Gill Century : शुबमन गिलने अरुण जेटली स्टेडियममध्ये इतिहास घडवला आहे. शुबमनने विंडीज विरुद्ध कसोटी कारकीर्दीतील दहावं शतक ठोकत गौतम गंभीरला पछाडलं आहे.

टीम इंडियाचा युवा कर्णधार शुबमन गिल याने वेस्ट इंडिज विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी विक्रमी शतक ठोकलं आहे. शुबमनने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिममध्ये कसोटी कारकीर्दीतील 10 वं शतक ठोकलं. तसेच शुबमननं कर्णधार म्हणून हे पाचवं शतक ठरलं. शुबमनने यासह भारताचा माजी फलंदाज आणि विद्यमान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा रेकॉर्ड ब्रेक केला. शुबमनने नक्की काय रेकॉर्ड केलाय? हे सविस्तर जाणून घेऊयात.
शूबमनने भारतीय डावातील 130 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर 3 धावा घेत शतक पूर्ण केलं. शुबमनने यासह गंभीरच्या 9 कसोटी शतकांचा विक्रम मोडीत काढला. शुबमनने 177 चेंडूत आणि 57.63 च्या स्ट्राईक रेटने शतक पूर्ण केलं. शुबमनने या खेळीत 1 सिक्स आणि 13 फोर लगावले. तसेच शुबमनने कॅप्टन म्हणून विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली.
‘विराट’ विक्रमाची बरोबरी
शुबमन एका वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये 5 शतकं करणारा एकूण दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. विराटने 2017 आणि 2018 या वर्षांमध्ये कॅप्टन म्हणून प्रत्येकी 5-5 शतकं केली होती. विराटने 2017 साली 16 आणि 2018 मध्ये 24 डावात ही कामगिरी केली होती. तर शुबमनने अवघ्या 12 डावात कॅप्टन म्हणून 5 शतकं केली.
शुबमन तिसरा कर्णधार
तसेच शुबमन कमी डावात 5 कसोटी शतकं करणारा एकूण तिसरा तर दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. कॅप्टन म्हणून कमी डावात 5 शतकं करण्याचा विक्रम हा इंग्लंडचा माजी फलंदाज सर एलिस्टर कूक याच्या नावावर आहे. कूकने 9 डावात 5 शतकं झळकावली होती. भारताचे माजी आणि दिग्ग्ज फलंदाज सुनील गावसकर यांनी 10 डावात 5 शतकं पूर्ण केली होती. त्यानंतर आता शुबमनने या मानाच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे.
दरम्यान शुबमनने तिसऱ्या आणि चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. शुबमनने तिसऱ्या विकेटसाठी यशस्वी जैस्वाल याच्यासह 137 चेंडूत 74 धावांची भागीदारी केली. त्यानंतर नितीश कुमार रेड्डीसह चौथ्या विकेटसाठी 105 चेंडूत 91 धावा जोडल्या. तर ध्रुव जुरेलसह 50 प्लस भागीदारी दरम्यान शतक झळकावलं.
शुबमनचा शतकी जल्लोष
𝙂𝙡𝙤𝙧𝙞𝙤𝙪𝙨 𝙂𝙞𝙡𝙡 ✨
A 💯 to savour from the #TeamIndia skipper 🫡
His first as Captain on home soil 🇮🇳
Updates ▶ https://t.co/GYLslRzj4G#INDvWI | @IDFCFIRSTBank | @ShubmanGill pic.twitter.com/ocO5Hk5hrr
— BCCI (@BCCI) October 11, 2025
भारताचा डाव घोषित
दरम्यान भारताने ध्रुव जुरेल याचा रुपात पाचवी विकेट गमावली. ध्रुव 44 धावांवर आऊट झाला. यासह शुबमनने भारताचा डाव 134.2 ओव्हरमध्ये 5 आऊट 518 रन्सवर घोषित केला. जुरेलने 44 रन्स केल्या. तर शुबमन नाबाद 129 धावांची खेळी केली.
