IND vs ENG: अक्षर उपकर्णधार झाल्याने सूर्या-हार्दिकच्या नात्यात कटुता? कॅप्टनने सांगितलं….
Suryakumar Yadav on Hardik Pandya : इंडिया-इंग्लंड पहिल्या टी 20i सामन्याच्या पूर्वसंध्येला कर्णधार सूर्यकुमार यादव याने हार्दिक पंड्या याच्यासोबत असलेल्या नात्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20I मालिकेला 22 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. कोलकातामधील इडन गार्डनमध्ये सलामीचा सामना खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादव हा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर ऑलराउंडर अक्षर पटेल याला इंग्लंडविरुद्धच्या टी 20I मालिकेसाठी उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. हार्दिक पंड्या वर्षभरापेक्षा अधिक वेळ टी 20I संघाचं नेतृत्व करत होता. मात्र रोहित शर्मा याच्या निवृत्तीनंतर जेव्हा पूर्णवेळ कर्णधार नियुक्ती करण्याची वेळ आली तेव्हा सूर्यकुमारला जबाबदारी देण्यात आली. तर आता अक्षरला उपकर्णधार केलं आहे. त्यामुळे हार्दिकचं भारतीय संघातील वजन कमी झालंय का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
तसेच अक्षरला उपकर्णधारपद मिळाल्याने कर्णधार सूर्यकुमार आणि हार्दिक यांच्यातील नात्यात फरक पडेल का? असा प्रश्नय या निमित्ताने उपस्थित केला जात होता. यावर सूर्यानेच प्रतिक्रिया दिली. आमच्यात असं काहीच होणार नसल्याचं सूर्यकुमारने म्हटलं. सूर्याने कोलकातात पहिल्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत प्रतिक्रिया दिली. हार्दिककडे जरी उपकर्णधारपदाचा टॅग नसेल, तरी माझा मित्र हा टी 20I नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे, असं सूर्याने म्हटलं.
सूर्या हार्दिकबाबत काय म्हणाला?
“त्याच्यासोबत (हार्दिक) फार चांगले संबंध आहेत. आम्ही फार वेळेपासून एकत्र खेळत आहोत. मला चांगलं आठवतंय, मी 2018 साली मुंबईत परतलो होतो. तेव्हा पहिल्यांदा आम्ही एकत्र खेळलो होतो, तेव्हापासून ते आतापर्यंत सर्व तसंच आहे. मला इथे फक्त अधिकची जबाबदारी मिळाली आहे. जेव्हा आम्ही फ्रँचायजी क्रिकेट खेळू तेव्हा मी थोडा आराम करु शकतो” असं सूर्या म्हणाला. सूर्या आणि हार्दिक आयपीएलमध्ये मुंबई या फ्रँचायजीसाठी खेळतात. हार्दिक आयपीएलमध्ये मुंबईचं नेतृत्व करतो.
अक्षरला अधिकची जबाबदारी
“आम्ही मैदानात चांगले मित्र राहिलो आहोत. टीम इंडियासोबत पुढे जाण्यासाठी काय करायला हवं? याची आम्हाला माहिती आहे. अक्षरला अधिकची जबाबदारी देण्यात आली आहे. अक्षरने टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत काय केलंय हे मी पाहिलंय. अक्षर सातत्याने टीमसोबत आहे. सोबतच हार्दिक नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. आम्ही जेव्हा एकत्र असतो तेव्हा टीमसह पुढे जाण्यासाठी काय करायला हवं, हे ठरवतो. इतकंच काय तर हार्दिक मैदानातही जवळच असतो. आमच्याकडे मैदानात खूप कर्णधार आहेत”, असंही सूर्याने नमूद केलं.
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.
