Jeet Pabari : चेतेश्वर पुजारा याच्या मेहुण्याचं टोकाचं पाऊल, जीत पाबारीने जीवन संपवलं, कारण काय?
Who Is Jeet Pabari : भारताचा माजी संकटमोचक फलंदाज चेतेश्वर पुजारा याचा मेहुणा जीत पाबरी याने स्वत: संपवलं आहे. आता या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.

अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी आणि दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजारा याच्या मेहुण्याने जीवन संपवलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीत पाबारी याने राहत्या घरी आत्महत्या करत जीवनाचे दोर कापले आहेत. जीत पाबारी याने केलेल्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. जीत पाबारी याच्यावर गेल्या वर्षी नोव्हेंबर 2024 मध्ये लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून गुन्हा दाखल करण्यात आला होता. जीत पाबरी याच्यावर त्याच्या न झालेल्या भावी पत्नीने हा आरोप केला होता. त्यामुळे जीतवर बरोबर 1 वर्षाआधी 26 नोव्हेंबर 2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. जीतने यामुळेच जीवन संपवलं नाही ना? याबाबत आता पोलीस अधिक तपास करत आहेत. जीतने आयुष्य संपवलं तेव्हा चेतेश्वर पुजारा भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात कॉमेंट्री करत होता.
पुजाराच्या नावाने धमकावलं, मारहाणही केली, तरुणीचे जीतवर आरोप
जीतने साखरपुड्यानंतर अनेकदा माझ्यासोबत शारिरीक संबंध ठेवले होते. मात्र जीतने त्यानंतर कोणतंही कारण नसताना साखरपुडा मोडला. जीतने त्यानंतर दुसऱ्या तरुणीसह लग्न केलं, असा दावा जीतच्या न झालेल्या पत्नीने केला. तसेच मला पुजाराच्या नावावर धमकावलं जात होतं. जीतने मला मारहाण केली होती, असा आरोपही या जीतच्या न झालेल्या पत्नीने केला. या सर्व आरोपांमुळे जीतने मानसिकरित्या खचला होता, असं म्हटलं जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जीत राजकोटचा रहिवाशी होता. जीतने राहत्या घरी स्वत:ला संपवलं. या दरम्यान शेजाऱ्यांना ओरडण्याचा आवाज आला. त्यामुळे शेजारी सतर्क झाले. त्यानंतर जीतने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केल्याचं शेजाऱ्यांना समजलं. शेजाऱ्यांनी क्षणाचा विलंब न करता जीतला रुग्णालयात नेलं. मात्र जीतला मृत घोषित करण्यात आलं. तसेच जीतच्या जवळपास कोणतीही चिठ्ठीही मिळाली नाहीय. त्यामुळे आता जीतने त्या आरोपातूनच स्वत:ला संपवलंय की त्यामागे आणखी काही कारण आहे? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
पाबरी कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर
दरम्यान जीतच्या मृत्युमुळे पाबरी कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जीतवर अंत्यसंस्कार कधी आणि कुठे करण्यात येणार? याबाबतची माहिती अजून मिळालेली नाही. तर दुसर्या बाजूला आता पोलिसांच्या तपासातून काय समोर येतं? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
