Shikhar Dhawan याचा अखेरच्या क्षणी चॅम्पियन्स ट्रॉफीत समावेश, आयसीसीची मोठी घोषणा
Shikhar Dhawan Icc Champions Trophy 2025 : टीम इंडियासाठी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या शिखर धवनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. धवनचा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेचं आयोजन हे पाकिस्तान आणि यूएईमध्ये करण्यात आलं आहे. पाकिस्तानकडे या स्पर्धेचं यजमानपद आहे. मात्र टीम इंडिया सुरक्षिततेच्या कारणामुळे या स्पर्धेतील 3 सामने हे दुबईत खेळणार आहे. तर इतर 7 संघ त्यांचे सामने रावळपिंडी, लाहोर आणि कराचीत खेळणार आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. सर्व संघांनी आपल्या खेळाडूंची नावं जाहीर केली आहेत. या स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर शिखर धवन याचा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे.
आयसीसीने शिखर धवन याची इव्हेंट ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे. आयसीसीने इव्हेंट ॲम्बॅसेडर एकूण चौघांची नावं जाहीर केली आहेत. या चौघांमध्ये धवनसह ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराउंडर शेन वॉटसन, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथी आणि पाकिस्तानच्या सरफराज खान याचा समावेश करण्यात आला आहे. हे चौघेही या स्पर्धेरदरम्यान उपस्थित राहणार आहेत.
शिखर धवनची प्रतिक्रिया
“चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग होणं ही खास भावना आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत ॲम्बॅसेडर म्हणून सामन्याचा आनंद घेणं हा मोठा सन्मान आहे. माझ्यसााठी ही खास स्पर्धा आहे. माझ्या या स्पर्धेसह अनेक आठवणी आहेत”, अशा भावना धवनने व्यक्त केली. धवनने एकूण 2 वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. धवनने दोन्ही वेळा गोल्डन बॅटवर नाव कोरलं. चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फंलदाजाचा गोल्डन बॅट देऊन सन्मान केला जातो.
टीम इंडियासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा
दरम्यान शिखर धवन याच्या नावावर टीम इंडियाकडून चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आहे. शिखर धवन याने चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाचं 10 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. धवनने या 10 सामन्यांमध्ये 77.88 च्या सरासरीने 701 धावा केल्या आहेत. धवनने या दरम्यान 3 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती.