Hardik Pandya | हार्दिक पंड्या याची उपकर्णधारपदावरुन हकालपट्टी! कुणाला मिळणार संधी?
Hardik Pandya Vice Captaincy | आशिया कपसाठी 21 ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा होणार आहे. निवड समिती हार्दिक पंड्या याच्याबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

मुंबई | आशिया कप 2023 साठी सोमवारी 21 ऑगस्ट रोजी टीम इंडियाची घोषणा होणार आहे. आशिया कपनंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची वनडे सीरिज खेळणार आहे. या वनडे सीरिजनंतर आयसीसी वनडे वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. विराट कोहली याच्यानंतर रोहित शर्मा टीम इंडियाची कॅप्टन्सी करतोय. तर स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या हा उपकर्णधारपदाची जबाबदारी सार्थपणे पार पडतोय. तसेच रोहित उपलब्ध नसल्यावर हार्दिकने अनेकदा कॅप्टन म्हणून सूत्र सांभाळली आहेत. मात्र आता हार्दिकची उपकर्णधारपदावरुन हकालपट्टी होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मीडिया रिपोर्ट्नुसार, कर्णधारपदी रोहित शर्मा काय राहिल. मात्र हार्दिक पंड्या याचं उपकर्णधारपद धोक्यात आहे. हार्दिकऐवजी जसप्रीत बुमराह याला टीम इंडियाचं उपकर्णधार केलं जाऊ शकतं. जसप्रीत बुमराह 11 महिन्यांनी दुखापतीतून सावरल्यानंतर आयर्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करतोय. तसेच हार्दिक पंड्या टी 20 क्रिकेटमध्ये पूर्णवेळ कर्णधार आहे. हार्दिकच्या नेतृत्वात टीम इंडिया वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 मालिकेत पराभूत व्हावं लागलं.
वेस्ट इंडिजने टीम इंडियाचा 5 सामन्यांच्या मालिकेत 3-2 ने पराभव केला. विंडिजने यासह 2016 नंतर टीम इंडिया विरुद्ध टी 20 मालिका जिंकण्याची कामगिरी केली. त्यामुळे हार्दिकला वनडे टीमच्या उपकर्णधार पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंट घेऊ शकते.
जसप्रीत बुमराह याने गेल्या वर्षी कसोटीत टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं. तसेच बुमराह याने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर उप कर्णधार म्हणून मैदानात जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे बुमराहकडे उपकर्णधार म्हणून पर्याप्त अनुभव आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह उपकर्णधार म्हणून बीसीसीआयची पहिली पसंती आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध आयर्लंड यांच्यात आज (30 ऑगस्ट) दुसरा टी 20 सामना खेळवण्यात येणार आहे. या 3 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने आघाडीवर आहे. टीम इंडियाने पहिला टी 20 सामना हा डकवर्थ लुईस नियमानुसार 2 धावांनी जिंकला होता. आता हा दुसरा सामना जिंकून टीम इंडियाला मालिका जिंकण्याची संधी आहे. तर आयर्लंडसाठी हा ‘करो या मरो’ असा सामना आहे. त्यामुळे या दुसऱ्या सामन्यासह टीम इंडिया जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात टी 20 मालिका जिंकते का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
