IND vs AUS: विराटचा ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजआधी मोठा निर्णय! नक्की काय?
Virat Kohli India Tour Of Australia 2025 : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 19 ऑक्टोबरपासून एकदिवसीय मालिकेने होणार आहे. उभयसंघातील पहिला सामना हा पर्थमध्ये होणार आहे. त्याआधी टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने मोठा निर्णय घेतला आहे.

टीम इंडियाने वेस्ट इंडिजला कसोटी मालिकेत 2-0 ने लोळवलं. भारताचा हा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील आणि शुबमन गिल याच्या नेतृत्वातील पहिला मालिका विजय ठरला. त्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20I मालिका खेळणार आहे. टीम इंडिया 3 वनडे आणि 5 टी 20I सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. शुबमन गिल या सीरिजमधून वनडे कॅप्टन म्हणून डेब्यू करणार आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी जोडीचं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 महिन्यांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर कमबॅक होणार आहे. त्यामुळे प्रत्येक चाहत्यांना एकदिवसीय मालिकेचे वेध लागले आहेत. या मालिकेला 19 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी विराटने घेतलेल्या एका मोठ्या निर्णयाची चर्चा रंगली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बुधवारी 15 ऑक्टोबरला रवाना होणार आहे. कोणत्याही दौऱ्यासाठी रवाना होण्याआधी भारतीय खेळाडूंची एकत्र जमण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. त्यानुसार विराटने मोठा निर्णय घेतला आहे. विराटने ब्रिटेनवरुन परस्पर न जाता टीम इंडियासह दिल्लीवरुन ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचं वृत्त रेव्ह स्पोर्ट्सने दिलं आहे. विराट गेल्या अनेक वर्षांपासून लंडनला राहत आहे.
विराट दिल्लीत दाखल
रेव्ह स्पोर्ट्सनुसार, विराट 14 ऑक्टोबरपर्यंत दिल्लीत पोहचणार आहे. त्यानुसार विराट अवघ्या काही वेळापूर्वी भारतात दाखल झाला आहे. आरसीबी आयपीएल 18 व्या मोसमातील चॅम्पियन ठरली. विराट त्यानंतर क्रिकेटपासून दूर आहे. विराट तेव्हापासूनच लंडनमध्ये आहे. मात्र विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतात आला आहे. त्यानंतर टीम इंडियासह ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.
तसेच भारताचा माजी एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा हा देखील मंगळवारीच राजधानी दिल्लीला पोहचणार आहे. टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा आणि अंतिम कसोटी सामना हा दिल्लीत खेळवण्यात आला. त्यामुळे टीम इंडिया राजधानी दिल्लीतून ऑस्ट्रेलियाला निघणार आहे.
शुबमन गिल नेतृत्वासाठी सज्ज
दरम्यान निवड समितीने या दौऱ्यासाठी 4 ऑक्टोबरला भारतीय संघाची घोषणा केली. यासह नव्या एकदिवसीय कर्णधाराचं नावही जाहीर करण्यात आलं. शुबमन गिल याची एकदिवसीय कर्णधारपदी नियुक्ती केली. शुबमन ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून रोहित शर्मा याची जागा घेणार आहे. त्यामुळे शुबमन कॅप्टन म्हणून पहिल्या सीरिजमध्ये कशी कामगिरी करतो? याकडेही क्रिकेट विश्वाचं लक्ष असणार आहे.
