IND vs AUS : कांगारुंची धुलाई फिक्स! पाहा रोहित-विराटची ऑस्ट्रेलिया विरुद्धची आकडेवारी
Rohit Sharma and Virat Kohli vs Australia In Odi : टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. क्रिकेट चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या पुनरागमनाचे वेध लागले आहेत. या दोघांची ऑस्ट्रेलिया विरुद्धची आकडेवारी कशी आहे? जाणून घ्या.

टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला अवघ्या काही दिवसांनी सुरुवात होणार आहे. टीम इंडिया 15 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. तर 19 ऑक्टोबरपासून या दौऱ्यातील सुरुवात 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेने होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकूण 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेचा थरारही रंगणार आहे. मात्र एकदिवसीय मालिका टीम इंडियासाठी, चाहत्यांसाठी आणि क्रिकेट विश्वासाठी खास असणार आहे. या मालिकेतून टीम इंडियाची अनुभवी जोडी रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक होणार आहे.
रोहित आणि विराट दोघेही टी 20I आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे हे दोघे 9 मार्चनंतर थेट 19 ऑक्टोबरला मैदानात उतरणार आहेत. या मालिकेआधी रोहित शर्मा याला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आलं आहे. शुबमन गिल या मालिकेतून कर्णधार म्हणून नव्या इनिंगची सुरुवात करणार आहेत. त्यामुळे शुबमन कॅप्टन म्हणून ऑस्ट्रेलियात कसं नेतृत्व करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. मात्र त्यापेक्षाही रोहित आणि विराटच्या गेमकडे चाहत्यांची करडी नजर असणार आहे. या निमित्ताने रोहित आणि विराटची ऑस्ट्रेलियातील कामगिरी कशी राहिली आहे? हे आपण आकड्यांच्या माध्यमातून जाणून घेऊआत.
रोकोची ऑस्ट्रेलियातील आकडेवारी
फक्त एका सामन्याचा अपवाद वगळला तर रोहित आणि विराट या दोघांनीही ऑस्ट्रेलियात समसमान एकदिवसीय सामने खेळले आहेत. रोहित आतापर्यंत ऑस्ट्रेलियात 19 एकदिवसीय सामने खेळला आहे. रोहितने या 19 सामन्यांमध्ये 58.23 च्या सरासरीने आणि 90.99 च्या स्ट्राईक रेटने एकूण 990 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 4 शतकं आणि 2 अर्धशतकं झळकावली आहेत.
रनमशीन विराट कोहली
विराटने आतापर्यंत ऑस्ट्रेलियात 18 एकदिवसीय सामने खेळले आहेत. विराटने 88.71 च्या स्ट्राईक रेटने आणि 47.17 च्या एव्हरेजने 802 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 3 शतकं आणि 4 अर्धशतकं केली आहेत. त्यामुळे रो-को जोडीची ऑस्ट्रेलिया विरुद्धची आकडेवारी ही कांगारुंना धडकी भरवणारी आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे या दोघांनी आकडेवारीला साजेशी अशीच कामगिरी पुन्हा एकदा करुन दाखवावी आणि भारताला मालिका जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजवावी, अशी आशा चाहत्यांना असणार आहे.
एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
पहिला सामना, 19 ऑक्टोबर, पर्थ
दुसरा सामना, 23 ऑक्टोबर, एडलेड
तिसरा सामना, 25 ऑक्टोबर, सिडनी
