Most International Matches Win : सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने जिंकणारे संघ, टीम इंडियाचा कितवा नंबर?
Most Successful Team In International Cricket : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या संघाच्या नावावर आहे? भारतीय संघाने आतापर्यंत किती सामने खेळले आहेत? जाणून घ्या.

ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्धची 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर पहिला टी 20i सामना पावसामुळे रद्द झाला. तर ऑस्ट्रेलियाने एमसीजी अर्थात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये झालेल्या दुसऱ्या टी 20i सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 1160 वा विजय ठरला. ऑस्ट्रेलियाने यासह सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने (कसोटी+एकदिवसीय+टी 20i) जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आणखी भक्कम केला. या निमित्ताने सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकणाऱ्या 5 संघाबाबत आपण जाणून घेऊयात.
तसेच सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत टीम इंडिया दुसऱ्या स्थानी आहे. टीम इंडियाने आतापर्यंत एकूण 923 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. तसेच इतर 3 संघ कोणते आहेत? जाणून घेऊयात.
ऑस्ट्रेलिया नंबर 1
ऑस्ट्रेलिया क्रिकेट विश्वातील यशस्वी संघांपैकी एक आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत एकूण 2 हजार 111 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाने त्यापैकी 1 हजार 160 सामने जिंकले आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया 1 हजार पेक्षा अधिक सामने जिंकणारी एकमेव टीम आहे.
टीम इंडिया
टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना जिंकला होता. भारत यासह इंग्लंडला मागे टाकत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा दुसरा संघ ठरला. टीम इंडियाने 922 आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याचा इंग्लंडचा रेकॉर्ड मोडीत काढला. भारताने 1 हजार 920 सामने खेळले आहेत. भारताने त्यापैकी 923 सामने आपल्या नावावर केले आहेत. तर 704 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे.
इंग्लंड तिसऱ्या स्थानी
इंग्लंड सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकणारा तिसरा संघ आहे. इंग्लंडने आतापर्यंत 2 हजार 122 सामने खेळले आहेत. इंग्लंडने त्यापैकी 922 सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाचा धुव्वा उडवला आहे. तर इंग्लंडला 792 वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
पाकिस्तान चौथ्या स्थानी
पाकिस्तान सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत चौथ्या स्थानी विराजमान आहे. पाकिस्तानने आतापर्यंत एकूण 1 हजार 737 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. पाकिस्तानने त्यापैकी 832 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर पाकिस्तान 700 व्या पराभवाच्या जवळ आहे. पाकिस्तानला तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून एकूण 698 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे.
दक्षिण आफ्रिकेचा पाचवा नंबर
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने जिंकणाऱ्या टॉप 5 संघांमध्ये सर्वात शेवटच्या स्थानी दक्षिण आफ्रिका आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमने 1 हजार 377 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दक्षिण आफ्रिकेने त्यापैकी 721 सामने जिंकले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेला 499 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे.
