Boxing Day: बापरे बाप, एकाच दिवशी 29 सामन्यांचा थरार, विराटही खेळणार, भारताचा सामना कुठे?

क्रिकेट चाहत्यांसाठी 26 डिसेंबर हा दिवस पर्वणी असणार आहे. शुक्रवारी क्रिकेट चाहत्यांना तब्बल 29 सामन्यांचा थरार रंगणार आहे. यामध्ये टीम इंडियाच्या मॅचचाही समावेश आहे. जाणून घ्या

Boxing Day: बापरे बाप, एकाच दिवशी 29 सामन्यांचा थरार, विराटही खेळणार, भारताचा सामना कुठे?
Virat Kohli Vht Delhi Team
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 25, 2025 | 10:48 PM

मेन्स टीम इंडिया सध्या विश्रांतीवर आहे. टीम इंडिया आता थेट नववर्षात 11 जानेवारीपासून एक्शन मोडमध्ये असणार आहे. त्यामुळे चाहत्यांना मेन्स टीम इंडियाच्या सामन्यासाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे. मात्र चाहत्यांसाठी यंदा 26 डिसेंबर (बॉक्सिंग डे क्रिकेट) खास ठरणार आहे. यंदा बॉक्सिंग डे क्रिकेटच्या दिवशी एकूण आणि तब्बल 29 सामन्यांचा थरार रंगणार आहे. या सामन्यांमध्ये कसोटी आणि टी 20 चा समावेश असणार आहे. शुक्रवार 26 डिसेंबरपासून एका लोकप्रिय स्पर्धेच्या नव्या हंगामालाही सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठीची बक्षिस रक्कम (Prize Money) 38 कोटी इतकी आहे. शुक्रवारपासून कोणते सामने खेळवण्यात येणार? हे सविस्तर जाणून घेऊयात.

बॉक्सिंग डे म्हणजे काय?

युके, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, कॅनडा, न्यूजीलंड या सारख्या देशात 26 डिसेंबरला सार्वजिनक सुट्टी असते. या देशात बॉक्सिंग डे हा 26 डिसेंबरला साजरा केला जातो. भारतात 26 डिसेंबरला तसं काही नसतं. मात्र क्रिकेट चाहत्यांसाठी हा दिवस नक्कीच खास असतो.

बॉक्सिंग डे आणि एमसीजी

पंरपरेनुसार यंदाही मेलबर्न क्रिकेट ग्राउंडमध्ये (MCG) बॉक्सिंग डे टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. ही परंपरा 1980 पासून सुरु आहे. या दिवशी एमसीजीमध्ये 1 लाख क्रिकेट चाहते उपस्थिती लावतात. यंदा 26 डिसेंबरपासून एशेज सीरिजमधील चौथा सामना हा या मैदानात रंगणार आहे. ऑस्ट्रेलिया इंग्लंड विरुद्धच्या या 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका वूमन्स यांच्यात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. तर तिसरा सामना हा 26 डिसेंबरला होणार आहे.

बीबीएल

बिग बॅश लीग या ऑस्ट्रेलियातील लोकप्रिय स्पर्धेत शुक्रवारी 2 सामने होणार आहेत. या स्पर्धेत सिडनी सिक्सर्स विरुद्ध मेलबर्न स्टार आणि पर्थ स्कॉचर्स विरुद्ध होबार्ट हॅरिकन्स यांच्यात थरार रंगणार आहे.

बीपीएल

बीपीएल अर्थात बांगलादेश प्रीमयर लीग स्पर्धेच्या नव्या हंगामाची शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या दिवशी 2 सामने होणार आहेत.

SA 20 स्पर्धेची सुरुवात

दक्षिण आफ्रिकेच्या SA 20 स्पर्धेची सुरुवातही ‘बॉक्सिंग डे’ पासून होणार आहे. या स्पर्धेतसाठी बक्षिस रक्कम ही 38 कोटी आहे. महाविजेत्या संघाला 16.5 कोटी तर उपविजेत्याला 8 कोटी इतकी रक्कम बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे. या स्पर्धेतही पहिल्याच दिवशी डबल हेडरचा थरार रंगणार आहे.

न्यूझीलंडमध्ये Super Smash टी 20 लीग स्पर्धेत पुरुष आणि महिला संघाचे असे एकूण 2 सामने होणार आहेत. तसेच यूएईमध्ये आयएलटी 20 (ILT 20) स्पर्धेत 1 सामना होणार आहे. तसेच भारतात देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत एकूण 19 सामनेही होणार आहत. अशाप्रकारे बॉक्सिंग डे (26 डिसेंबर) या दिवशी एकूण 29 सामन्यांचा थरार रंगणार आहे.