VID vs SAUR : पोट्टे जिंकले ना, विदर्भ VHT चॅम्पियन, फायनलमध्ये सौराष्ट्रचा धुव्वा
Vidarbha vs Saurashtra VHT Final 2025 2026 Result : कमबॅक कशाला म्हणतात हे विदर्भ क्रिकेट टीमने दाखवून दिलं आहे. गेल्या मोसमात उपविजेता राहिलेल्या विदर्भ क्रिकेट संघाने यंदा विजय हजारे ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

विदर्भाच्या पोट्ट्यांचं गेल्या स्पर्धेत चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं होतं. तेव्हा विदर्भाला अंतिम सामन्यात कर्नाटक विरुद्ध पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे विदर्भाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मात्र पोट्ट्यांनी पराभवामुळे खूचून न जाता जोरदार मुसंडी मारली. विदर्भ क्रिकेट टीमने हर्ष दुबे याच्या नेतृत्वात ऐतिहासिक कामगिरी केली आहे. विदर्भाने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील 2025-2026 या मोसमातील अंतिम सामन्यात सौराष्ट्रचा धुव्वा उडवला आहे. विदर्भ यासह विजय हजारे ट्रॉफी चॅम्पियन ठरली आहे. विदर्भाची ही ट्रॉफी जिंकण्याची पहिलीच वेळ ठरली आहे.
ओपनर अथर्व तायडे याने केलेल्या शतकाच्या जोरावर विदर्भाने सौराष्ट्रसमोर 318 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र सौराष्ट्रला विजयी धावांचा पाठलाग करताना संपूर्ण 50 षटकंही खेळता आलं नाही. विदर्भाने सौराष्ट्रला 7 बॉल आणि 38 धावांआधी रोखलं. विदर्भाच्या गोलंदाजांनी सौराष्ट्रचं 48.5 ओव्हरमध्ये 279 धावांवर पॅकअप केलं. विदर्भाने अशाप्रकारे विजय हजारे करंडकावर आपलं नाव कोरलं. तर सौराष्ट्रला उपविजेतापदावर समाधान मानावं लागलं.
