VHT 2026: विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत विदर्भाची धडक, कर्नाटकला 6 गडी राखून लोळवलं
विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेच्या अंतिम फेरीत विदर्भाने धडक मारली आहे. उपांत्य फेरीत कर्नाटकचा 6 गडी राखून पराभव केला. आता अंतिम फेरीत पंजाब विरुद्ध सौराष्ट्र सामन्यातील विजेत्याशी लढत होणार आहे.

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेतील उपांत्य फेरीचा एक सामना विदर्भ आणि कर्नाटक यांच्यात पार पडला. हा सामना विदर्भाने 6 गडी राखून जिंकला आणि अंतिम फेरीत धडक मारली आहे. कर्नाटकने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. पण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय चुकला. कर्नाटकने 49.4 षटकात सर्व गडी गमवून 280 धावा केल्या. तसेच विजयासाठी 281 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान विदर्भाने 46.2 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यातील विजयाचा शिल्पकार ठरला तो गोलंदाज दर्शन नळकांडे आणि फलंदाज अमन मोखाने.. दर्शन नळकांडेने 10 षटकात 48 धावा देत 5 गडी बाद केले. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे निम्मा संघ तंबूत गेला. तर धावांचा पाठलाग करताना अमन मोखाडेने 122 चेंडूत 12 चौकार आणि 2 षटकार मारत 138 धावा केल्या. आता विदर्भाचा अंतिम फेरीत सामना पंजाब विरुद्ध सौराष्ट्र सामन्यातील विजेत्याशी होईल.
कर्नाटकने प्रथम फलंदाजी स्वीकारली पण सुरूवात काही चांगली झाली नाही. मयंक अग्रवाल आणि देवदत्त पडिक्कल स्वस्तात बाद झाले. त्यानंतर करूण नायरने डाव सावरला. त्याने 90 चेंडूत 76 धावांची खेळी केली. तर कृष्णण श्रीजिथने 53 चेंडूत 54 धावा केल्या. या दोघांच्या खेळीमुळे विदर्भाला 280 धावांपर्यंत मजल मारता आली. या व्यतिरिक्त श्रेयस गोपाळने 36, अभिनव मनोहरने 26 धावा केल्या. तर फलंदाजांनी कामगिरी सुमार राहिली. त्यामुळे कर्नाटकचं मोठी धावसंख्या गाठण्याचं स्वप्न भंगलं. विदर्भाने चांगली गोलंदाजी केल्याने त्यांचं टार्गेट पूर्ण होऊ शकलं नाही.
Through to the final! 👏
Vidarbha with a six-wicket victory against Karnataka in the first semi-final 👌#VijayHazareTrophy | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/gQOhUSbb77
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 15, 2026
विदर्भाने विजयी धावांचा पाठलाग करताना सावध सुरुवात केली. अथर्व तायडेच्या रुपाने पहिला धक्का बसला. पण त्यानंतर अमन मोखाडेने ध्रुव शोरेसह डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी केली. ध्रुव शोरे बाद झाल्यानंतर रविकुमार समर्थ मैदानात उतरला. अमन मोखाडेने त्याच्याबरोबर चांगलाच जम बसवला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 147 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी विजयासाठी महत्त्वाची ठरली. अमन मोखाडे बाद झाल्यानतंर रोहित बिनकर मैदानात उतरला. मग रविकुमार समर्थने त्याच्यासोबत 26 धावांची भागीदारी केली. रोहित बाद झाला आणि हर्ष दुबे उतरला. पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. कारण रविकुमार समर्थने 69 चेंडूत नाबाद 76 धावा करत हा सामना संपवला.
