VHT : मुंबई सहाव्या सामन्यासाठी सज्ज, हिमाचल प्रदेशचं आव्हान, रोहित खेळणार की नाही?
Himachal Pradesh vs Mumbai VHT : शार्दूल ठाकुर याने त्याच्या नेतृत्वात मुंबईला 5 पैकी 4 सामन्यांत विजयी केलं. आता श्रेयस संघात कमबॅक झाल्यानंतर त्याच्या पहिल्या सामन्यात मुंबईला विजयी करण्यात यशस्वी ठरणार का? याकडे मुंबईकर चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठेच्या विजय हजारे स्पर्धेत (Vijay Hazare Trophy 2025-2026) यंदाच्या हंगामात मुंबई आपला सहावा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. मुंबईने या स्पर्धेत आतापर्यंत धमाकेदार कामगिरी केली आहे. शार्दूल ठाकुर याने (Shardul Thakur) त्याच्या नेतृत्वात मुंबईला सलग 4 सामने जिंकून दिले. मात्र मुंबईला पाचव्या सामन्यात विजयी लय कायम ठेवण्यात अपयश आलं. महाराष्ट्रने मुंबईला पराभूत करत विजय रथ रोखला. मुंबईचा हा या मोसमातील पहिला पराभव ठरला. आता मुंबई या स्पर्धेतील आपल्या सहाव्या सामन्यात हिमाचल प्रदेश (Mumbai vs Himachal Pradesh) विरुद्ध भिडणार आहे.
श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाची जबाबदारी
हिमाचल प्रदेश विरुद्धच्या सामन्याआधी मुंबईला मोठा झटका लागला आहे. हंगामी कर्णधार शार्दूल ठाकुर याला दुखापतीमुळे विजय हजारे ट्रॉफीतील मुंबईच्या 2 सामन्यांमधून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे दुखापतीनंतर कमबॅक होताच श्रेयस अय्यर याला (Shreyas Iyer) कर्णधारपदाची सूत्र देण्यात आली आहेत. त्यामुळे श्रेयस आता हिमाचल प्रदेश विरुद्ध कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
श्रेयस अय्यरसाठी महत्त्वाचा सामना
श्रेयससाठी अनेक अर्थाने हा सामना महत्त्वाचा असणार आहे. श्रेयस न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे सीरिजमध्ये खेळणार की नाही? हे हिमाचल विरूद्धच्या सामन्यातून स्पष्ट होईल. श्रेयसने फिटनेस टेस्ट पास केल्यावरच त्याला न्यूझीलंड विरुद्ध खेळता येईल, असं बीसीसीआयने स्पष्ट केलंय. त्यामुळे श्रेयससमोर आगामी एकदिवसीय मालिकेच्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश विरुद्धचा सामना हा अनेक अर्थाने निर्णायक असणार आहे.
यशस्वीच्या कामगिरीकडे लक्ष
दरम्यान हिमाचल प्रदेश विरूद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा आणि मुंबईचा ओपनर यशस्वी जैस्वाल याच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे. यशस्वी महाराष्ट्र विरूद्धच्या सामन्यात अपयशी ठरला होता. यशस्वीला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. त्यामुळे यशस्वी या सामन्यात मोठी खेळी करुन कमबॅक करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
मुंबई विरुद्ध हिमाचल प्रदेश सामन्याचं आयोजन हे जयपूरमधील जयपुरीया विद्यालय ग्राउंड इथे करण्यात आलं आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजता सुरुवात होईल. तर 8 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
रोहित खेळणार की नाही?
दरम्यान रोहित शर्मा या स्पर्धेतील उर्वरित सामन्यात खेळणार नाहीय. टीम इंडिया 11 जानेवारीपासून न्यूझीलंड विरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहे. त्यामुळे रोहितला मुंबई संघातून मुक्त करण्यात आलं आहे.
