नेमकं काय चुकलं? 371 धावा आणि सलग 6 सामन्यात विजय, तरीही रिंकु सिंहला डावललं
रिंकु सिंहने विजय हजारे ट्रॉफीत चमकदार कामगिरी केली आहे. त्याच्या नेतृत्वात उत्तर प्रदेश संघाने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात विजय मिळवला आहे. इतकंच काय तर त्याने 123.66च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

विजय हजारे ट्रॉफीत रिंकु सिंहची बॅट चांगलीच तळपली आहे. त्याच्या जबरदस्त फॉर्ममुळे उत्तर प्रदेशने विजयाची घोडदौड सुरू केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या सहा पैकी सहा सामन्यात विजय मिळवला आहे. 6 जानेवारीला निरंजन शाह स्टेडियममध्ये उत्तर प्रदेश आणि विदर्भ यांच्यात लढत झाली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल विदर्भने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. पण या सामन्यात रिंकु सिंहने आक्रमक फटकेबाजी केली आणि विदर्भाचं विजयाचं स्वप्न भंगलं आहे. उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 339 धावा केल्या. पण विदर्भला 50 षटकात 9 गडी गमवून 285 धावांपर्यंत मजल मारता आली. उत्तर प्रदेशने हा सामना 54 धावांनी जिंकला. या सामन्यातही रिंकु सिंहची बॅट चांगलीच तळपली. त्याने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यात साजेशी कामगिरी केली आहे. या सामन्यातही पाचव्या क्रमांकावर उतरत त्याने 30 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार मार्त 57 धावा केल्या.
रिंकु सिंहने विजय हजारे ट्रॉफीत खेळलेल्या सहा सामन्यात 371 धावा केल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी रेट हा 123.66 चा आहे. इतकंच काय तर 145हून अधिक स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्याने एक शतक आणि 3 अर्धशतक ठोकले आहेत. या दरम्यान 29 चौकार आणि 14 षटकार मारले. रिंकु सिंह सध्या जबरदस्त फॉर्मात असल्याचं दिसून येत आहे. लिस्ट ए स्पर्धेतील त्याची ही जबरदस्त कामगिरी आहे. असं असूनही त्याला भारताच्या वनडे संघात स्थान मिळताना दिसत नाही. रिंकु सिंहने आतापर्यंत फक्त दोन वनडे सामने खेळले आहेत. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात त्याला संधी मिळाली होती. आता न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याला काही स्थान मिळालं नाही.
रिंकु सिंह 21 डिसेंबर 2023 रोजी शेवटचा वनडे सामना खेळला होता. म्हणजेच 25 महिन्यांपूर्वी त्याने सामना खेळला होता. दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी त्याला संधी मिळताना दिसत नाही. रिंकु सिंहने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 62 डावात 52.62 च्या सरासरीने 2368 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेट 101 पेक्षा जास्त आहे. यात दोन शतकं आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. रिंकु सिंह मधल्या फळीत चांगली फलंदाजी करतो आणि सामना जिंकवण्याची ताकदही आहे. पण त्याला टीम इंडियात अजून तरी हवी तशी संधी मिळाली नाही. कारण या स्थानावर अष्टपैलू खेळाडूला जागा मिळते. जसं की हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा वगैरे.. रिंकु सिंह गोलंदाजी करत नसल्याने त्याला स्थान मिळणं कठीण होते.
