भारताविरुद्ध फायनल जिंकण्यासाठी काय करावं लागेल? मिचेल सँटनरने स्पष्टच सांगितलं की…
चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या स्पर्धेचा शेवट आता 9 मार्चला होणार आहे. न्यूझीलंड आणि भारत हे दोन संघ जेतेपदासाठी आमनेसामने उभे राहणार आहेत . या सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने कंबर कसली आहे. दक्षिण अफ्रिकेला पराभूत केल्यानंतर लगेचच त्याने याबाबत आपलं म्हणणं मांडलं.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. न्यूझीलंड आणि भारत दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भिडणार आहे. यापूर्वी 2000 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत न्यूझीलंडने भारताला 4 गडी आणि 2 चेंडू राखून पराभूत केलं होतं. आता 25 वर्षानंतर हे दोन संघ पुन्हा एकदा भिडणार आहेत. या स्पर्धेच्या साखळी फेरीत भारताने न्यूझीलंडचा 44 धावांनी धुव्वा उडवला होता. पण अंतिम फेरीत गाफील राहून चालणार नाही. न्यूझीलंडने आयसीसी स्पर्धेत कायम भारताची अडवणूक केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप, वनडे वर्ल्डकप असो की चॅम्पियन्स ट्रॉफी.. आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडचं भारतासमोर तगडं आव्हान राहिलं आहे. असं असताना न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने माईंडगेम सुरु केला आहे. भारताविरुद्ध अंतिम सामन्यात काय रणनिती असेल याबाबत आपलं म्हणणं मांडलं आहे.
‘आज आम्हाला एका चांगल्या संघाने आव्हान दिले होते, ही एक चांगली बाजू आहे. आम्ही दुबईला जाणार आहोत जिथे आम्ही आधीच भारताचा सामना केला होता. आम्ही विश्रांती घेऊ आणि पुन्हा जाऊ.’ असं सँटनरने दक्षिण अफ्रिकेला पराभूत केल्यानंतर सांगितलं. त्यानंतर दुबईत भारताकडून साखळी फेरीत पराभव झाला होता, अंतिम सामन्यासाठी कशी रणनिती असेल? यावर मिचेल सँटनरने मन मोकळं केलं. ‘आम्ही तिथे जाणार आहोत आणि दबावाखाली असणं कधीही चांगलं असतं. मला वाटते की आमच्या गोलंदाजांनी आघाडीच्या फलंदाजांना झटपट बाद केलं होतं. मला असं वाटतं की टॉस जिंकला तर बरंच काही चांगलं होईल.’ असं सँटनर म्हणाला.
न्यूझीलंडची सामना जिंकण्यासाठी पहिली नजर ही नाणेफेकीवर असणार आहे. नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर मनासारखा निर्णय घेता येणार आहे. आतापर्यंत भारताने धावांचा पाठलाग करून विजय मिळवला आहे. पण न्यूझीलंडविरुद्धचा सामना अपवाद ठरला होता. या सामन्यात भारताने 249 धावांचं आव्हान न्यूझीलंडसमोर ठेवलं होतं. पण न्यूझीलंडचा संघ 205 धावांवरच सर्वबाद झाला. हा सामना भारताने 44 धावांनी जिंकला आहे. त्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माचं नशिब खराब आहे. त्याने कर्णधारपदात 11 वेळा नाणेफेक गमावली आहे. तर भारताची सलग नाणेफेक गमवण्याची 14 वी वेळ आहे. त्यामुळे सँटनरच्या मते नाणेफेक जिंकणं किती महत्त्वाचं आहे हे स्पष्ट होतं.
