IND vs AUS : भारताने वनडे सामना कुठे गमावला? कर्णधार गिलने एका वाक्यात सांगितलं
भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची वनडे मालिका 2-0 ने गमावली. खरं तर दुसऱ्या वनडे सामन्यात विजयाची स्थिती होती. मात्र भारताला या सामन्यात कमबॅक करता आलं नाही. भारताने हा सामना कुठे गमावला याबाबत कर्णधार शुबमन गिलने स्पष्ट काय सांगितलं.

भारत ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका 2-0 ने खिशात घातली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारताने 50 षटकात 9 गडी गमवून 264 धावा केल्या आणि विजयासाठी 265 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 46.2 षटकात 8 गडी गमवून पूर्ण केलं. खरं तर या सामन्यात भारताला विजय मिळवण्याची संधी होती. पण सुरुवातीला मोठी धावसंख्या उभारण्यात आणि त्यानंतर गोलंदाजीतही भारताने सुमार कामगिरी केली. त्यात गचाळ क्षेत्ररक्षणाची भर पडली. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांना संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करत त्यांनी विजयाच्या वेशीवर आणून सोडलं. भारताने या सामन्यात एक दोन नाही तर तीन झेल सोडले.
कर्णधार शुबमन गिलने याने पराभवासाठी गचाळ क्षेत्ररक्षणाला जबाबदार धरलं. जर हातातले सोपे झेल सोडले तर सामना हातून जाणारच ना? असं स्पष्टपणे सांगितलं. सामन्यानंतर समालोचकाशी बोलताना शुबमन गिल म्हणाला की, ‘आमच्याकडे फक्त पुरेशा धावा होत्या. अशा धावसंख्येचा बचाव करण्यासाठी दोन-तीन संधी सोडल्या तर ते कधीच सोपे नसते. पहिल्या सामन्यात पावसामुळे नाणेफेक अधिक महत्त्वाची होती. पण या सामन्यात मी जास्त काही सांगणार नाही कारण दोन्ही संघ जवळजवळ 50 षटके खेळले. सुरुवातीला खेळपट्टी थोडी जास्त होती. पण मला वाटते की 15-20 षटकांनंतर खेळपट्टी चांगली स्थिरावली.’
चौथ्या षटकात अर्शदीप सिंग गोलंदाजी करण्यासाठी आला होता. या षटकात ट्रेव्हिस हेडचा झेल सोडला. ट्रेव्हिस हेड किती महागात पडू शकतो याचा अंदाज आहे. ट्रेव्हिस हेड तेव्हा 7 धावांवर खेळत होता. अर्शदीप सिंगच्या या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हा झेल सुटला. नितीश कुमार रेड्डीने ही संधी सोडली. त्यानंतर ट्रेव्हिस हेड 28 धावा करून बाद झाला. 16 व्या षटकात पुन्हा एकदा झेल सुटला. नितीश कुमार रेड्डीच्या गोलंदाजीवर मॅथ्यू शॉर्टचा सोपा झेल सोडला. 23 धावांवर असताना अक्षर पटेलने त्याचा झेल सोडला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या गोलंदाजीवर शॉर्टला पुन्हा जीवदान मिळालं. यावेळी सिराजने हातातला झेल सोडला. तेव्हा तो 55 धावांवर होता. त्यानंतर 78 चेंडूत 74 धावा करून बाद झाला.
