IND vs SA Toss : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची बॅटिंग, मॅचविनर खेळाडूचं कमबॅक, सामना 1 तास विलंबाने
India Women vs South Africa Women Toss Result and Playing 11 : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून भारतीय संघाला फलंदाजीसाठी भाग पाडलं आहे. या सामन्यातून भारतीय संघात मॅचविनर खेळाडूचं कमबॅक झालं आहे. पाहा प्लेइंग ईलेव्हन.

आयसीसी वनडे वूमन्स वर्ल्ड कप 2025 स्पर्धेतील दहाव्या सामन्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमेनसामने आहेत. दोन्ही संघांचा हा तिसरा सामना आहे. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे विशाखापट्टणममधील वायझॅग स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला नियोजित वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे टॉस 62 मिनिटांच्या विलंबाने करण्यात आला आहे. दुपारी 3 वाजून 32 मिनिटांनी टॉस उडवण्यात आला. दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे.
दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट हीने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेत भारताला फलंदाजीसाठी भाग पाडलं आहे. सामन्याला तब्बल 1 तासानंतर सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी 1-1 बदल केला आहे.
अमनजोत कौरचं कमबॅक
अपेक्षेनुसार, टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये ऑलराउंडर अमनजोत कौर हीचं कमबॅक झालं आहे. अमनजोतला आजारामुळे पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याला मुकावं लागलं होतं. अमनजोतच्या कमबॅकमुळे रेणुका सिंह ठाकुरला बाहेर बसावं लागलं आहे. रेणूकाला पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यासाठी अमनजोतच्या जागी संधी देण्यात आली होती. तर दक्षिण आफ्रिकेनेही 1 बदल केला आहे. तुमी सेखुखुणे हीला संधी देण्यात आली आहे. तर मसाबता क्लास हीला बाहेर करण्यात आलं आहे.
टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेवर वरचढ
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकूण 33 एकदिवसीय सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने 33 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. भारताने दक्षिण आफ्रिकेला 20 सामन्यांमध्ये पराभूत केलंय. तर दक्षिण आफ्रिकेने 12 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर 1 सामन्याचा निकाल लागू शकला नाही.
टीम इंडिया पराभवाची हॅटट्रिक टाळणार?
दक्षिण आफ्रिकेने भारताला गेल्या 2 वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत केलंय. भारताला 2017 आणि 2022 अशा दोन्ही वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे भारतासमोर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवाची हॅटट्रिक टाळण्याचं आव्हान असणार आहे.
टीम इंडियाला सलग सहाव्या विजयाची संधी
भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला गेल्या 5 एकदिवसीय सामन्यात पराभूत केलंय. त्यामुळे भारताचा एकंदरीत दक्षिण आफ्रिकेवर दबदबा असल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होतं. त्यामुळे आता भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला सलग सहाव्यांदा पराभूत करत या वर्ल्ड कप स्पर्धेत विजयी हॅटट्रिक पूर्ण करणार का? याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष असणार आहे.
वूमन्स टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : प्रतिका रावल, स्मृती मांधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), स्नेह राणा, अमनजोत कौर, क्रांती गौड आणि श्री चरणी.
वुमन्स दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : लॉरा वोल्वार्ड (कॅप्टन), तझमिन ब्रिट्स, सुने लुस, मारिझान कॅप, अनेके बॉश, सिनालो जाफ्ता (विकेटकीपर), क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, तुमी सेखुखुने आणि नॉनकुलुलेको मलाबा.
