Womens World Cup : श्रीलंका आणि न्यूझीलंडचं उपांत्य फेरीचं गणित बिघडलं, भारताला फायदा
वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत उपांत्य फेरीची चुरस रंगात असताना श्रीलंका आणि न्यूझीलंडला मोठा फटका बसला आहे. पावसामुळे सामना ड्रॉ झाला आणि पुढचं गणित फिस्कटलं आहे. या गणितामुळे काही अंशी भारताला फायदा झाला आहे.

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेत उपांत्य फेरीची चुरस सुरु झाली आहे. कारण प्रत्येक संघाने सात पैकी तीन ते चार सामने खेळले आहेत. त्यामुळे आता यापुढे होणाऱ्या प्रत्येक सामन्याचा उपांत्य फेरीच्या शर्यतीवर परिणाम होणार आहे. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात या स्पर्धेतील चौथा सामना होता. दोन्ही संघांना या स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी विजय खूपच महत्त्वाचा होता. मात्र पावसामुळे दोन्ही संघांचा हिरमोड झाला आहे. या दोन संघापैकी विजयी संघाची पुढची वाटचाल थोडी काही होईना सोपी झाली असती. पण सामना पावसामुळे ड्रॉ झाल्याने आता प्रत्येकी एक गुण मिळाला आहे. त्यामुळे गुणतालिकेत फार काही फरक पडला नाही. पण काही अंशी भारताला फायदा झाला आहे. कारण श्रीलंका, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांग्लादेश हे संघ या स्पर्धेतील कमकुवत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या संघांचं जितकं नुकसान तितका भारताला फायदा होईल असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही.
न्यूझीलंडने चार सामने खेळले असून दोन गमावले आहेत. तर एक सामना ड्रा झाला आहे. त्यामुळे 3 गुण आहेत. त्यामुळे भारताला फायदा झाला आहे. कारण भारताचे चार गुण असून चौथ्या स्थानावर आहे. हा सामना न्यूझीलंडने जिंकला असता तर चौथ्या स्थानावर विराजमान होऊ शकला असता. पण तसं झालं नाही. आता न्यूझीलंडला त्यामुळे उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवला तर 9 गुण होतील. एकही सामना गमावला तर उपांत्य फेरीचं गणित फिस्कटू शकते.
श्रीलंकेने सध्या चार पैकी 2 सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. त्यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना ड्रॉ झाल्याने प्रत्येकी 1 गुण पदरात पडला आहे. आता उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवला तर 6 गुण मिळतील. म्हणजेच 8 होतील. पण येथेही टॉपच्या चार संघांनी 8च्या वर गुण मिळवले तर श्रीलंका स्पर्धेतून बाद होईल.
भारताने आतापर्यंत चार सामने खेळले असून दोन सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. त्यामुळे उर्वरित तीन सामन्यात विजय मिळवावा लागेल. भारताने तिन्ही सामन्यात विजय मिळवला तर भारताचं उपांत्य फेरीचं गणित सुटू शकते. कारण श्रीलंका आणि न्यूझीलंडचं चित्र बिघडलं आहे. तर पाकिस्तान आणि बांग्लादेश गुणांच्या शर्यतीत नाहीत. त्यामुळे भारतासाठी पुढचा प्रत्येक सामना करो या मरोची लढाई आहे. एका सामन्यात पराभव झाला तर जर तर वर गणित येईल.
