RCB vs MI, WPL 2026 : मुंबईसाठी करो या मरो सामना, पलटण आरसीबीचा हिशोब करणार का?
Royal Challengers Bengaluru Women vs Mumbai Indians Women : मुंबई विरुद्ध आरसीबी वूमन्स दोन्ही संघ चौथ्या मोसमात दुसऱ्यांदा आमनेसामने भिडणार आहेत. आरसीबीला या सामन्यात मुंबईवर मात करत आपलं पहिलं स्थान आणखी मजबूत करण्याची संधी आहे.

वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील चौथ्या मोसमात (WPL 2026) आतापर्यंत 5 संघांनी साखळी फेरीतील 8 पैकी प्रत्येकी 6-6 सामने खेळले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिले आणि सलग 5 सामने जिंकून प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. तर आता उर्वरित 2 जांगासाठी 4 संघांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. गतविजेता मुंबईला या मोसमात लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. मुंबईने 6 पैकी 4 सामने गमावले आहेत. तर फक्त 2 सामन्यांमध्येच विजय मिळवता आला आहे.
या डब्ल्यूपीएलच्या चौथ्या मोसमातील 16 व्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्ससमोर आरसीबीचं आव्हान असणार आहे. आरसीबीने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. तर मुंबईसाठी प्लेऑफच्या समीकरणांनुसार हा सामना करो या मरो असा आहे. त्यामुळे मुंबईला हा सामना जिंकणं भाग आहे. त्यामुळे पलटणचा या सामन्यात चांगलाच कस लागणार आहे. उभयसंघातील सामना कधी आणि कुठे पाहता येणार? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
आरसीबी विरुद्ध मुंबई सामना कधी?
आरसीबी विरुद्ध मुंबई यांच्यातील सामना हा सोमवारी 26 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.
आरसीबी विरुद्ध मुंबई सामना कुठे?
आरसीबी विरुद्ध मुंबई सामना यांच्यातील सामन्याचा थरार हा बडोद्यातील कोतांबी इथे असलेल्या बीसीए स्टेडियममध्ये रंगणार आहे.
आरसीबी विरुद्ध मुंबई सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
आरसीबी विरुद्ध मुंबई सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.
आरसीबी विरुद्ध मुंबई सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार?
आरसीबी विरुद्ध मुंबई सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह मॅचचा थरार अनुभवता येईल.
मुंबई पलटवार करणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु वूमन्स या दोन्ही संघांची या चौथ्या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी मुंबई-आरसीबी दोन्ही संघ 9 जानेवारीला आमनेसामने आले होते. तेव्हा आरसीबीने स्मृती मंधानाच्या नेतृत्वात मुंबईवर 3 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स या पराभवाची परतफेड करत आरसीबीचा हिशोब चुकता करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
मुंबई कितव्या स्थानी?
दरम्यान 15 सामन्यांनंतर आरसीबी या पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. तर मुंबई चौथ्या स्थानी आहे.
