Sunil Gavaskar : भारतीय क्रिकेटमधून काढून फेकलं पाहिजे.. सुनील गावस्करांचा गंभीर आणि बुमराहवर निशाणा
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यानंतर माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी जसप्रीत बुमराह आणि गौतम गंभीरवर निशाणा साधत एक मोठे विधान केले आहे. ते दोघांच्याही निर्णयावर अजिबात खूश नाहीत.

केनिंग्टन ओव्हल येथे झालेल्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडविरुद्ध चांगली कामगिरी केली आणि 6 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताच्या सर्व खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आणि त्यांच्या संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, ओव्हल कसोटी जिंकूनही माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी गौतम गंभीर आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर निशाणा साधला आहे, त्यांनी एक मोठ विधान केलंय. माजी कर्णधार गावस्कर यांच्या मते, भारतीय क्रिकेटच्या शब्दकोशातून एक शब्द पूर्णपणे काढून टाकला पाहिजे.
दिलं सिराजचं उदाहरण
एका वृत्तवाहिनीशी बोलताना गावस्कर म्हणाले, एक म्हण आहे की गोलंदाज तुम्हाला सामने जिंकवतात पण तुम्हाला धावाही काढाव्या लागतात. टीम इंडियाने धावा केल्या नाहीत आणि म्हणूनच त्यांनी दोन सामने गमावले. मोहम्मद सिराजने सातत्याने गोलंदाजी केली आणि वर्कलोडचा प्रश्न पूर्णपणे सोडवला. मला आशा आहे की ‘वर्कलोड’ हा शब्द भारतीय क्रिकेटच्या शब्दकोशातून काढून टाकला पाहिजे आणि मी हे बऱ्याच काळापासून सांगतोय, असं ते म्हणाले. सिराजने पाचही कसोटी सामन्यांमध्ये 6 ओव्हर्स, 7 ओव्हर्स आणि 8 ओव्हर्सचा स्पेल चाकला, कारण कर्णधाराला ते हवं होतं आणि देशालाही त्याच्याकडून तेच अपेक्षित होते.
आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे, वर्कलोड ही फक्त मानसिकता आहे आणि ती काही शारीरिक गोष्ट नाही. सीमेवर उभे असलेले भारतीय सैनिक थंडीबद्दल तक्रार करतात का? 140 कोटी लोकांच्या देशात तुम्हाला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे आणि तुम्ही ती अशीच जाऊ देता कामा नये, असं गावस्करांनी सुनावलं.
असं का म्हणाले गावस्कर ?
सुनील गावस्कर यांनी केलेल्या विधानामागे देखील एक कारण आहे. ते म्हणजे, ही कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांनी हे नमूद केलं होतं की, वर्कलोडमुळे जसप्रीत बुमराह फक्त तीन सामन्यांमध्ये भाग घेईल. या 5 सामन्यांच्या या कसोटी मालिकेत बुमराह फक्त 3 सामन्यांमध्ये खेळला. त्याने पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत भाग घेतला. मात्र बुमरहाचं हे वागण सुनील गावस्कर यांना अजिबात आवडलं नाही. बुमराहच्या गुडघ्याची समस्या असल्याने संघ व्यवस्थापनाने त्याच्याबाबत हा निर्णय घेतला होता. मात्र सुनील गावस्कर यांनी मोहम्मद सिराजचे उदाहरण दिलं. त्याने पाचही कसोटी सामन्यांमध्ये गोलंदाजी केली आणि लांब स्पेल टाकले असं गावस्कर म्हणाले.
बरोबरीत सुटली कसोटी मालिका
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना इंग्लंडने जिंकला होता, तर दुसरा कसोटी सामना टीम इंडियाने जिंकला. तिसरा कसोटी सामना इंग्लंडने जिंकला मात्र दोन्ही संघांमधील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला आणि काल संपलेला पाचवा आणि शेवटचा सामना भारताने जिंकला. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी 374 धावांची आवश्यकता होती पण त्यांचा संघ फक्त 367 धावाच करू शकला. मोहम्मद सिराजबद्दल बोलायचे झाले तर, त्याने या शेवटच्या सामन्यात एकूण 9 विकेट घेतल्या आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. एवढंच नव्हे तर तो या कसोटी मालिकेत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता. त्याने पाच कसोटी सामन्यात 23 बळी घेतले. अखेर ही कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली.
