U19 टीमच्या हेड कोचला खेळाडूंनीच चोपलं, पण का? काय कारणं? मारुन मारुन खांदा तोडला, डोक्यावर 20 टाके
भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठी घटना घडली आहे. अंडर 19 टीमच्या हेड कोचवर खेळाडूंनीच हल्ला केला. खूप वाईट पद्धतीने कोचला मारहाण झाली. मारुन मारुन त्याचा खांदा तोडला. डोक्यावर 20 टाके पडले आहेत.

Cricket Controversy : अंडर 19 टीमचे हेड कोच एस.वेंकेटरमन यांच्यावर तीन स्थानिक क्रिकेटपटुंनी हल्ला केला. 8 डिसेंबरची ही घटना आहे. यात हेड कोचच्या डोक्याला मार लागला आहे. मारहाणीमुळे त्यांचा खांदा फ्रॅक्चर झाला. सैयद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी टीममध्ये निवड न झाल्याने हे तीन खेळाडू नाराज होते, असं बोललं जातय. या प्रकरणात आता एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पुदुचेरी क्रिकेट असोशिएशनमधील हे प्रकरण आहे. हेड कोच वेंकटरमण यांच्या डोक्यावर 20 टाके घालण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी खेळाडू अजून फरार आहेत. त्यांना पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पुढील कारवाईनंतर अधिक माहिती दिली जाईल असं सेडारापेट पोलीस स्टेशनचे उप निरीक्षक एस.राजेश यांनी सांगितलं.
इंडियन एक्सप्रेसने 9 डिसेंबरला पुदुचरीमध्ये क्रिकेट संदर्भात सुरु असलेल्या एका घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. खोटी प्रमाणपत्र आणि आधारा पत्त्याचा उपयोग करुन दुसऱ्या राज्याच्या खेळाडूंना कसं स्थानिक म्हणून दाखवलं जातं, या घोटाळ्याचा रिपोर्टमधून खुलासा करण्यात आला होता. हेच कारण आहे की, 2021 पासून रणजी ट्रॉफीमध्ये पुदुचेरीचं प्रतिनिधीत्व करणारे केवळ पाचच खेळाडू स्थानिक आहेत. पुदुचेरी क्रिकेट असोसिएशनचा रिपोर्ट समोर आल्यानंतर बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी आपली प्रतिक्रिया दिली. काही गंभीर आरोप असल्याने बोर्ड लवकरच प्रकरणाची चौकशी करेल असं ते म्हणाले.
ते तीन खेळाडू कोण?
U19 टीम हेड कोच एस वेंकेटरमण CAP चे माजी सचिवही होते. त्यांनी 8 डिसेंबरला स्वत:वर झालेल्या हल्ल्याची तक्रार नोंदवली. त्यांनी तीन स्थानिक क्रिकेटपटुंची नावं घेतली. यात कार्तिकेयन जयसुंदरम, ए अरविंदराज आणि एस संतोष कुमारन हे तीन खेळाडू आहेत. यात कार्तिकेयन सीनियर प्लेयर आहे. वेगवेगळ्या फॉर्मेटमध्ये तो 6 सामने खेळलाय. अरविंदराज आणि संतोष कुमारन यांनी रणजी ट्रॉफीमध्ये पुदुचेरीचं प्रतिनिधीत्व केलय. वेंकटरमण यांनी आपल्या तक्रारीत पुदुचेरी क्रिकेटर्स फोरमचे सचिव जी चंद्रन यांच्यावर हल्ला घडवून आणण्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप केला.
वेंकटरमण यांच्यावर उलटा आरोप
भरतिदासन पुदुचेरी क्रिकेटर्स फोरमने चंद्रन यांच्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. वेंकटरमण यांच्यावर आधीपासून अनेक प्रकरण दाखल आहेत. स्थानिक क्रिकेटपटूंसोबत ते चुकीच्या पद्धतीने वागतात असं स्थानिक क्रिकेटर्स फोरमचे अध्यक्ष सेन्थिल कुमारन यांनी सांगितलं.
