विसरभोळा रोहित आणि तीनपैकी 2 सामन्यात बदललेली जर्सी

विसरभोळा रोहित आणि तीनपैकी 2 सामन्यात बदललेली जर्सी

हॅमिल्टन (न्यूझीलंड): न्यूझीलंडविरुद्धच्या टी 20 मालिकेत कर्णधारपद सांभाळणाऱ्या रोहित शर्माने, या मालिकेतील तीनपैकी दोन सामन्यात वेगवेगळ्या जर्सी घातल्या. रोहित शर्माच्या विसरभोळेपणाचे अनेक किस्से यापूर्वी बातम्यांमधून समोर आले आहेत. कधी रोहित शर्माने हॉटेलमध्ये पासपोर्ट विसरला, तर कधी महागडं साहित्य बसमध्येच सोडून गेला होता. सध्या रोहित शर्मा त्याची जर्सी तर विसरला नाही ना असा प्रश्न आहे. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टी 20 सामन्यांपैकी दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यात तो दुसऱ्या खेळाडूंची जर्सी घालून मैदानात उतरला.

रोहित शर्माने दुसऱ्या टी 20 सामन्यात विजय शंकरची जर्सी घातली होती. तर तिसऱ्या टी 20 सामन्यात तो हार्दिक पंड्याची जर्सी घालून मैदानात उतरला होता.

एरव्ही रोहित शर्मा 45 नंबरची जर्सी घालून मैदानात उतरतो. मात्र अखेरच्या दोन्ही टी 20 सामन्यात त्याची ही जर्सी दिसली नाही. दुसऱ्या टी 20 मध्ये विजय शंकरची 59 नंबरची जर्सी घातली, ती मॅच भारताने जिंकली, तर तिसऱ्या सामन्यात हार्दिक पंड्याची 33 नंबरची जर्सी घालून तो मैदानात उतरला, मात्र भारताचा या सामन्यात निसटता पराभव झाला.

विजय शंकर (43), कर्णधार रोहित शर्मा (38) आणि दिनेश कार्तिकच्या नाबाद 33 धावानंतरही भारताला अखेरच्या निर्णायक टी 20 सामन्यात न्यूझीलंडवर विजय मिळवता आला नाही. भारताचा 4 धावांनी पराभव झाल्याने, ही मालिकाही हातातून निसटली.

Published On - 12:25 pm, Mon, 11 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI