वहिनीला सांगू का?; शाहिद आफ्रिदीने दिली होती राहुल द्रविडला धमकी, नेमकं प्रकरण काय?
Shahid Afridi Big Statement: शाहिद आफ्रिदीने राहुल द्रविडबद्दल एक मजेशीर किस्सा सांगितला होता. एका सामन्यादरम्यान त्याने राहुल द्रविडला धमकी दिली होती. नेमकं अफ्रिदी काय म्हणाला जाणून घ्या...

सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा दोन्ही देशांतील अनेक क्रिकेटपटूंमध्ये चांगली मैत्री होती. खेळाडू जेव्हा भेटायचे, तेव्हा एकमेकांशी हसत-खेळत गप्पा मारायचे. असाच एक मजेदार किस्सा माजी पाकिस्तानी कर्णधार शाहिद आफ्रिदीने सांगितला. तो म्हणाला की, भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज राहुल द्रविड मैदानावर पूर्णपणे शांत राहायचा. कोणी त्याच्यासमोर जाऊन त्याला शिव्या दिल्या तरी तो त्याकडे दुर्लक्ष करायचा. त्यामुळे त्याला बाद करणं खूप कठीण होतं.
नेमकं काय झालं होतं?
आफ्रिदीने सांगितलं की, एकदा मीही त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला, पण द्रविडने माझ्याकडेही लक्ष दिलं नाही. मग मी एक अनोखी युक्ती वापरली. ४८ वर्षीय माजी क्रिकेटपटू म्हणाला, “मैदानावर येऊन त्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला. राहुल पूर्ण आत्मविश्वासाने खेळत होता. त्याचं एकाग्र मन इतकं जबरदस्त होतं की आम्ही बोलायचो, त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करायचो, पण तो आम्हाला भाव द्यायचा नाही. मग मला त्याच्याबद्दल काहीतरी माहिती मिळाली. मी दोन-तीन वेळा त्याच्याकडे गेलो, पण त्याने मला उत्तर दिलं नाही. शेवटी मी त्याला म्हणालो, ‘बरं, मला उत्तर देत नाहीस ना? मला एक गोष्ट माहिती आहे, सामन्यानंतर वहिनीला सांगतो, थांब जरा.’ तेव्हा राहुल द्रविड घाबरला. तो म्हणाला, ‘अरे, वेडा झाला आहेस का? काय सांगणार आहेस?'”
वाचा: हार्ट ब्लॉकेज झाल्यास सुरुवातीला कोणती लक्षणे दिसतात? दुर्लक्ष करू नका
राहुल द्रविड सध्या राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक
सध्या दोन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. राहुल द्रविड सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक आहे. तर शाहिद आफ्रिदी क्रिकेटपासून दूर कुटुंबासोबत क्वालिटी वेळ घालवत आहे. २०२२ मध्ये त्याला पाकिस्तान क्रिकेट संघाचा हंगामी मुख्य निवडकरता म्हणून पाहिलं गेलं होतं, पण तो फार काळ या पदावर राहिला नाही आणि त्याने पद सोडलं.
