Sunil Chhetri : फुटबॉलपटू सुनील छेत्रीने तडकाफडकी केली निवृत्तीची घोषणा, कधी खेळणार शेवटचा सामना ?
आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंपैकी एक असलेल्या भारताचा अनुभवी कर्णधार छेत्री याने गुरुवारी, 16 मे रोजी सकाळी एका व्हिडिओद्वारे निवृत्तीची घोषणा केली.
भारताचा महान फुटबॉलपटू आणि भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंपैकी एक असलेल्या भारताचा अनुभवी कर्णधार छेत्री याने गुरुवारी, 16 मे रोजी सकाळी एका व्हिडिओद्वारे निवृत्तीची घोषणा केल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला.कुवेतविरुद्धचा विश्वचषक पात्रता सामना हा ( त्याचा) देशासाठीचा शेवटचा सामना असेल, असे गेल्या दीड दशकांहून अधिक काळ भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 39 वर्षीय सुनीलने सांगितले. 6 जून रोजी हा सामना होणार आहे. मात्र, आपण क्लब बेंगळुरू एफसीकडून खेळत राहू, असे त्याने स्पष्ट केले.
सुनील छेत्रीने 20 आणि 23 वर्षांखालील संघांसह भारतासाठी खेळताना त्याची विशेष छाप पाडली. त्यानंतर 2005 मध्ये सीनियर टीममध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो टीम इंडियाचा अविभाज्य भाग बनला होता. माजी कर्णधार आणि अनुभवी स्ट्रायकर बायचुंग भूतियाच्या निवृत्तीनंतर, छेत्रीने टीम इंडियाच्या आक्रमणाची जबाबदारीही घेतली आणि एकट्याने भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला.
भारतासाठी खेळणार अखेरचा सामना
सुनील छेत्री याने सुमारे 10 मिनिट लांबीचा हा व्हिडीओ शेअर करत निवृत्तीची घोषणा केली. 6 जून रोजी कलकत्ता येथे होणारा कुवेतविरुद्धचा सामना हा त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमधील शेवटचा सामना असेल, असे त्याने स्पष्ट केले. हा सामना विश्वचषक 2026 पात्रता फेरीचा भाग आहे, जिथे टीम इंडिया ग्रुप-ए मध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्यापुढे फक्त कतार आहे. या क्वालिफायरमध्ये भारतीय संघाची कामगिरी विशेष झाली नाही आणि पुढील फेरी गाठण्यासाठी त्यांना हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल. त्यामुळे टीम इंडिया आणि खुद्द सुनील छेत्री यांना हा शेवटचा सामना संस्मरणीय बनवायचा आहे.
I’d like to say something… pic.twitter.com/xwXbDi95WV
— Sunil Chhetri (@chetrisunil11) May 16, 2024
19 वर्षांच्या कारकिर्दीसाठी छेत्री याने त्याचे कर्णधार, प्रशिक्षक, वरिष्ठ आणि युवा संघसहकारी आणि सपोर्ट स्टाफचे आभार मानले. यासोबतच छेत्री म्हणाला की, ज्यांना वाटत होतं की मी निवृत्त व्हावं, त्यांना आता आनंद होईल, असंही त्याने नमूद केलं.
सर्वाधिक गोल्सचा रेकॉर्ड
सुनील छेत्री याने आत्तापर्यंत भारतासाठी सर्वाधिक, 150 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एवढंच नव्हे तर त्याने या 150 मॅचदरम्यान एकूण 94 गोल केले. जे भारतासाठी सर्वोच्च आहेत. सध्या खेळणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सीसारखे महान फुटबॉलपटू त्याच्या पुढल्या स्थानावर आहेत.