मिरच्या झोंबल्या ना! भारतीय टीमची जर्सी घालून खेळला पाकिस्तानी खेळाडू, तिरंगा पण हाती घेतला, मग झालं काय?
Team India Jersey: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणल्या गेले आहेत. पण पाकिस्तानी खेळाडूंचे भारत प्रेम कमी झालेले नाही. एका खेळाडूने मराठी भाषा शिकली. तर आता दुसरा थेट भारतीय संघाची जर्शी घालूनच मैदानात उतरला. काय आहे हा मामला?

Ubaidullah Rajput: भारतीय संघाची जर्शी घालून पाकिस्तानी खेळाडू मैदानात उतरल्याने एकच खळबळ उडाली. पाकिस्तानचा उबैदुल्लाह राजपूत यामुळे अडचणीत आला आहे. त्याच्यावर कार्यवाहीची टांगती तलवार लटकली आहे. नियमांचे उल्लंघन आणि देशाचा अवमान अशा दोन्ही प्रकारात त्याचे कृत्य मोडत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू उबैदुल्लाह राजपूत 16 डिसेंबर रोजी बहरीन येथे एका खासगी टुर्नामेंटमध्ये उतरला. तो भारतीय संघाकडून खेळला. त्याने भारतीय संघाची जर्शी घातली. इतकेच नाही तर या सामन्यात त्याने भारतीय ध्वज उंचावला. तो ध्वज त्याने हातात घेत आदर व्यक्त केला. उबैदुल्लाहचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे पाकिस्तानातील अनेकांना मिरच्या झोंबल्या.
पाकिस्तान कबड्डी महासंघाचे(PKF) सचिव राणा सरवर यांनी तात्काळ याप्रकरणी बैठक बोलावली आहे. 27 डिसेंबर रोजी याप्रकरणी बैठक होणार आहेत. राजपूत आणि इतर काही खेळाडूंनी नियम मोडल्याप्रकरणी ही बैठक होत आहेत. त्यात त्यांच्यावर काय कारवाई करावी, त्यांना किती दंड ठोठावावा, त्यांच्यावर किती वर्षांकरीता बंदी घालावी या मुद्दावर चर्चा होणार आहे.
मग उबैदुल्लाह भारताकडून खेळलाच का?
सरवर यांनी स्पष्ट केले की, ही एक खासगी टुर्नामेंट होती. आयोजकांनी येथे भारत, पाकिस्तान, कॅनडा, इराण आणि इतर नावाच्या टीम तयार केल्या होत्या. त्या टीममध्ये त्याच देशाचे खेळाडू खेळले. पण उबैदुल्लाह राजपूत हा पाकिस्तानकडून न खेळता भारताच्या खासगी संघात खेळला. इतरांनी असं कृत्य केलं नाही. उबैदुल्लाह हा भारताकडून खेळलाच का, असा त्यांचा सवाल आहे.
कुणाचीही परवानगी न घेता संघ बहरीनमध्ये
सरवर यांनी दावा केला की, 16 पाकिस्तानी खेळाडू महासंघाची अथवा पाकिस्तानी क्रीडा मंत्रालयाची परवानगी न घेताच बहरीन येथे गेले. त्यांनी यासंबंधीची कुठलीच माहिती दिली नाही. ते पाकिस्तानचा संघ म्हणून खेळले. पण क्रीडा खात्यालाच त्याची माहिती नाही. दरम्यान राजपूत याने माफी मागितली आणि बहरीन येथून आमंत्रण आल्याने आपण खेळायला गेल्याचा दावा केला आहे. या टीमचे नाव भारत होते की पाकिस्तान हे मला माहिती नव्हते अशी गुगली आता राजपूतने टाकली आहे. पण भारतीय तिरंगा हाती घेण्याचे स्पष्टीकरण अजून त्याने दिले नाही. त्याचा व्हिडिओ सध्या पाकिस्तानात व्हायरल झाला आहे. काहींनी ही चांगली सुरुवात असल्याचेही म्हटले आहे. तर काहींनी त्याच्यावर कारवाई न करण्याची मागणी केली आहे.
