मैदानावरील आक्रमकता कमी करायला हवी का? पत्रकाराच्या प्रश्नावरच कोहलीचा भडका

'मैदानावरील आक्रमकता कमी करुन संघासाठी चांगला आदर्श उभा करावा, असं तुला वाटत नाही का?' असा प्रश्न एका पत्रकाराने विचारताच विराट कोहलीचा पारा चढला

मैदानावरील आक्रमकता कमी करायला हवी का? पत्रकाराच्या प्रश्नावरच कोहलीचा भडका

ख्राईस्टचर्च : मैदानावरील आक्रमक वर्तनावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे का, असा प्रश्न विचारल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा पारा चढला. दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमान न्यूझीलंड संघाने व्हाईट वॉश दिल्यानंतर कोहलीची पत्रकार परिषद झाली. (Virat Kohli loses cool)

कसोटी मालिकेच्या दुसऱ्या दिवशी कोहली जोशात होता. केन विल्यमसन आणि टॉम लॅथम बाद झाल्यानंतर कोहलीने मैदानावरच जल्लोषही केला. पहिल्या डावात शमीने टॉम लॅथमला माघारी धाडल्यानंतर मैदानावर उपस्थित प्रेक्षकांना उद्देशून कोहलीने अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

कसोटी मालिकेतही टीम इंडियाला व्हाईट वॉश, न्यूझीलंडचा 7 विकेट्सनी विजय

‘मैदानावरील आपल्या आक्रमकतेला मुरड घालावी आणि आपल्या संघासाठी एक चांगला आदर्श उभा करावा, असं तुला वाटत नाही का?’ असा प्रश्न एका पत्रकाराने कोहलीला विचारला. यावर कोहली काहीसा चिडला. “तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला उत्तर विचारत आहे. नक्की काय घडलं, ते तुम्ही शोधून काढायला पाहिजे आणि मग आणखी चांगला प्रश्न विचारला पाहिजे. मी पंचांशी बोललो आहे. तुम्ही अर्धवट ज्ञान घेऊन इथे येऊ नका. धन्यवाद” असं उत्तर कोहलीने फणकारत दिलं.

न्यूझीलंड दौर्‍यादरम्यान कोहलीला फटके लगावताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अर्धशतकाचा टप्पा ओलांडण्यात विराटला केवळ एकदायच यश आलं. कसोटी मालिकेत तर तो 20 धावांचा टप्पाही गाठू शकला नाही.

भारताच्या निराशाजनक कामगिरीमुळे हेगली ओव्हल मैदानावरील न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात संघाचा सात गडी गमावून पराभव झाला.

ख्राईस्टचर्च कसोटी सामन्यात भारताने पहिल्या डावात 242 धावा केल्या होत्या. न्यूझीलंडला 235 धावांवर रोखण्यात टीम इंडियाला यश आलं होतं. त्यामुळे टीम इंडिया कसोटी मालिका बरोबरीत सोडवेल, अशी चाहत्यांना आशा वाटत होती. सामन्याच्या दुसऱ्या डावात टीम इंडिया अवघ्या 124 धावांवर गडगडली. या आव्हानाचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रापर्यंत न्यूझीलंडने एकही गडी न गमावता 46 धावांपर्यंत मजल मारली.

याआधी टी20 मालिकेत टीम इंडियाने न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिला होता. त्याचा वचपा न्यूझीलंडने उर्वरित दोन्ही मालिकांमध्ये काढला. किवींनी वनडे मालिका 3-0 ने, तर आता कसोटी मालिकाही 2-0 ने जिंकली आहे.

न्यूझीलंडने 180 गुणांसह जागतिक कसोटी क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकावर झेप घेतली आहे. 360 गुणांसह भारत अव्वल स्थानावर आहे. (Virat Kohli loses cool)

Published On - 10:49 am, Mon, 2 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI