प्रायव्हसी पॉलिसीवर मोदी सरकारच्या कठोर भूमिकेनंतर WhatsApp चं मोठं वक्तव्य; कंपनी म्हणते…

व्हॉट्सअ‍ॅप नव्या प्रायवसी पॉलिसीमुळे अधिक अडचणीत आलं आहे. मोदी सरकारने मंगळवारी व्हॉट्सअ‍ॅपला नवी प्रायवसी पॉलिसी मागे घेण्यास सांगितले होते. त्यावर आता कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे.

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅप आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालं आहे. सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा व्हॉट्सअ‍ॅप न पाहणारी व्यक्ती क्वचित शोधून सापडेल. तसेच व्हॉट्सअ‍ॅप नवनवीन फीचर्स बाजारात घेऊन येत असल्यानं तोसुद्धा युजर्सच्या आकर्षणाचा विषय असतो. आता व्हॉट्सअ‍ॅपनं एक नवीन धोरण आणलं असून, त्या धोरणाचा सामान्यांनी धसका घेतलाय. पण व्हॉट्सअ‍ॅपच्या या धोरणानं मित्र आणि कुटुंबीयांसह वापरकर्त्यांच्या संदेशांच्या गोपनीयतेवर कोणताही परिणाम होत नसल्याचा व्हॉट्सअॅपकडून खुलासा करण्यात आला आहे. (Whatsapp continues to Justify Privacy Policy update despite Modi govts objection)

दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅप नव्या प्रायवसी पॉलिसीमुळे अधिक अडचणीत आलं आहे. मोदी सरकारने मंगळवारी व्हॉट्सअ‍ॅपला नवी प्रायवसी पॉलिसी मागे घेण्यास सांगितले होते. त्यावर आता कंपनीने स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीने म्हटलं आहे की, लोकांची दिशाभूल करणारी माहिती काढून टाकण्याचे काम सध्या सुरु आहे. तसेच तुमच्या आणि युजर्सच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आम्ही तयार आहोत. व्हॉट्सअ‍ॅपच्या प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला आमच्या युजर्सना हमी द्यायची आहे की, आम्ही नव्या अपडेटद्वारे व्हॉट्सअ‍ॅपवरील युजर्सचा कोणताही डेटा फेसबुकसोबत शेअर करु शकत नाही.

नव्या प्रायवसी पॉलिसीद्वारे कंपनी फेसबुकवर माहिती सामायिक करण्यास वापरकर्त्यांना कसे भाग पाडत आहे, याबद्दल प्रश्न उपस्थित केला असता व्हॉट्सपनं त्यावर स्पष्टीकरणं दिलं आहे. फेसबुकच्या मालकीचे मेसेजिंग अ‍ॅप असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने सांगितले की, व्हॉट्सअॅपने “एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे आपल्या खासगी माहितीचे संरक्षण करणे सुरूच ठेवले आहे”. आपली वैयक्तिक माहिती आपल्याशिवाय इतर कोणीही पाहू शकत नाही किंवा आपले कॉल ऐकू शकत नाही. तसेच मूळ कंपनी असलेली फेसबुकसुद्धा वापरकर्त्यांचे संदेश किंवा कॉलची माहिती मिळवू शकत नाही.

व्हॉट्सअ‍ॅप तुमच्या मेसेज किंवा चॅटचा लॉग आणि कॉलची माहिती स्वतःजवळ ठेवत नाही किंवा फेसबुक वापरकर्त्यांशी सामायिक करत नाही. तसेच ज्या वापरकर्त्यांना आपल्या वैयक्तिक माहितीच्या चोरीची भीती सतावतेय, ते वापरकर्ते चॅट disappearing हे फिचर वापरु शकतात. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्यांसाठी कंपनीनं काही फीचर्स उपलब्ध करून दिले आहेत. “काही मोठ्या व्यवसायांना त्यांचे संभाषण राखून ठेवण्यासाठी होस्टिंग सेवा वापरण्याची आवश्यकता असल्याचं व्हॉट्सअॅपने अधोरेखित केले आहे. तसेच व्यवसायांना त्यांच्या ग्राहकांसह व्हॉट्सअॅप चॅट्स व्यवस्थापित करणंही सहज शक्य आहे, आम्ही व्यावसायिकांना फेसबुकद्वारे सुरक्षित होस्टिंग सेवा वापरण्याचा पर्याय देत आहोत. ”

सध्या अशी चर्चा आहे की, व्यावसायिक फेसबुकवर जाहिरातींच्या माध्यमातून वापरकर्त्यांनी सामायिक (शेअर) केलेली माहिती वापरू शकतात का. त्यावरही व्हॉट्सअ‍ॅपने खुलासा केला आहे. आपल्याला माहिती मिळाल्याची खात्री करण्यासाठी आम्ही फेसबुकवरून होस्टिंग सेवा वापरत असल्याचे स्पष्टपणे लेबल लावतो, असं कंपनीने सांगितलं आहे.

वापरकर्त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून शॉपिंग साईट्सवरून काही खरेदी केल्यास त्या वापरकर्त्याची माहिती फेसबुक वापरत असल्याची भीती असल्याचं वापरकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यावर व्हॉट्सअॅपनं स्पष्टीकरण दिलंय. ही अशी वैशिष्ट्ये पर्यायी असतात. फेसबुकवर जर आपला डेटा सामायिक होत असल्यास त्याची सूचना अ‍ॅपच्या माध्यमातून दिली जात असल्याचंही व्हॉट्सअॅपने स्पष्ट केले आहे.

सेवा अटी आणि गोपनीयता धोरणामधील बदलामुळे वापरकर्त्यांची माहिती सामायिक होत असल्यानं जागतिक स्तरावरून व्हॉट्सअॅपवर टीका होत होती. सोशल मीडियावर प्रभावी असलेल्या फेसबुककडूनही वापरकर्त्यांचा डेटा चोरी होत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यातच आता व्हॉट्सअ‍ॅपनं नवीन पॉलिसी आणल्यामुळे ग्राहकांना वेगळ्याच चिंतेनं ग्रासलंय.

मेसेजिंग सेवेचा वापर सुरू ठेवण्यासाठी वापरकर्त्यांनी 8 फेब्रुवारी 2021 पर्यंत नवीन अटी आणि धोरणास सहमती दर्शवावी, असे यात नमूद केले होते. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपने फेसबुकवर माहिती सामायिक केल्याची टीका होत आहे. त्यावरून व्हॉट्सअॅपनं हा खुलासा केलाय. व्हॉट्सअ‍ॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट यांनी ट्वीटच्या मालिकेत म्हटले होते. “जगात कुठेही मित्र किंवा कुटुंबाशी खासगी संवाद साधत असताना त्याचा गोपनीयतेवर कुठलाही परिणाम होत असल्याचं व्हॉट्सअ‍ॅपचे प्रमुख विल कॅथकार्ट यांनी ट्विट करत स्पष्ट केले होते.

व्हॉट्सअ‍ॅपने केलेल्या धोरणात्मक बदलानंतर प्रतिस्पर्धी प्लॅटफॉर्मची मागणीही वाढत आहे. प्रतिस्पर्धी मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर सिग्नल आणि टेलिग्राम दोघांनाही वापरकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात पसंत दिलीय. गेल्या आठवड्याच्या तुलनेत 2021 च्या पहिल्या सात दिवसांत व्हॉट्सअ‍ॅपच्या डाऊनलोड करणाऱ्यांमध्ये 11 टक्क्यांनी घट झालीय, असे डेटा अ‍ॅनालिटिक्स फर्म सेन्सर टॉवरने म्हटले आहे. जगभरात अजूनही ते सुमारे 10.5 दशलक्ष डाउनलोड झाले आहेत.

संबंधित बातम्या

WhatsApp | माहिती लीक होण्याची भीती? असा करा व्हॉट्सअ‍ॅपचा जुना डेटा डिलीट…

Privacy भंग होत असल्यास WhatsApp डिलीट करा : दिल्ली हायकोर्ट

WhatsApp विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका, नवे गोपनीयता धोरण बरखास्त करण्याची मागणी

(Whatsapp continues to Justify Privacy Policy update despite Modi govts objection)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI