Snake News : दंश का केला.. सापाचा आत्माच येऊन सांगतो ! कुठे भरतो नागराजाचा दरबार ?
लासुडिया परिहार गावात दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी 'सर्पांच्या राजाचा दरबार' भरतो. येथे नागदेवतेचे आत्मे मानवी शरीरात प्रवेश करून हनुमानजींसमोर आपली चूक कबूल करतात आणि पुन्हा कोणालाही त्रास न देण्याचे वचन देतात. हा एक अनोखा पारंपरिक विधी आहे, जिथे सर्पदंशावरील उपचारांसह न्याय दिला जातो. संत मंगलदास महाराजांनी सुरू केलेली ही प्रथा आजही गावाच्या ओळखीचा एक महत्त्वाचा भाग आहे.

Ajab Gajab News : सीहोरमध्ये दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी एक अनोखी परंपरा साजरी केली जाते, ते पाहून कोणालाही आश्चर्यच वाटेल. त्याला सापांची अदालत, सापांचे न्यायालय म्हटलं जातं. विशेष म्हणजे भगवान हनुमान हे या न्यायालयातील न्यायाधीश असतात आणि सापांच्या आत्म्यांचा खटला चालतो. एखाद्याला का डसलो हे ते सांगतात, असं म्हटलं जातं.
विशेष म्हणजे या दरबारात सापांचे आत्मे येतात, ते हनुमानजींना न्यायाधीश मानतात. असे म्हटले जाते की सुनावणी सुरू होताच, ढोलक, आणि मडक्याच्या तालावर विशेष मंत्र म्हटले जातात, तेव्हा नागदेवतेचे आत्मे काही बळींच्या शरीरात प्रवेश करतात. त्यानंतर पीडित व्यक्ती सापाप्रमाणे डोलायला लागते.
पीडित व्यक्तीचा आवाज हळूहळू बदलतो आणि मग ते कोणत्या सापाचे घर उद्ध्वस्त झाल्याचे, कोण चिरडलं गेलं किंवा कोणत्या सापाला विनाकारण मारले गेले, त्याचे वर्णन करतात. नागदेवता स्वतः स्पष्ट करतात, “मी तोच साप आहे ज्याने दंश केला होता. ते हनुमानासमोर त्याची चूक कबूल करतात आणि पुन्हा कधीही कोणालाही इजा न करण्याचे वचन देतात”. गावातील गन्नू महाराज त्यागी यांच्या मते, त्यांचे कुटुंब पिढ्यानपिढ्या ही परंपरा पाळत आले आहे. ते वर्षभर सर्पदंशावर उपचार करतात, परंतु दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी ते विशेष मंत्र, हवन आणि विधींसह “सर्पांच्या राजाचा दरबार ” आयोजित करतात.
काय काय घडतं ?
या दिवशी मंदिरात ‘कंडी’ हे पारंपारिक वाद्य वाजवलं जातं, त्याचा आवाज संपूर्ण परिसरात घुमत असतो. असे म्हटले जाते की याच सुरांचा आवाज ऐकून सापाचा आत्मा प्रगट होतो. संगीताची तीव्रता वाढत असताना, बळीचे हाव-भाव बदलतात, असं वाटतं की तिथे जणू काही अलौकिक शक्ती प्रकट झाली आहे. गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार, ही परंपरा चिन्नोटा येथून आलेल्या संत मंगलदास महाराजांनी सुरू केली होती. त्यांनी लोकांना “गुरु मंत्र” देऊन नागाचा दरबार सुरू केला. आजही त्यांची समाधी मंदिरात आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळे हा विधी यशस्वी झाला असा भक्तांचा विश्वास आहे.
एवढंच नव्हे तर असे म्हटले जाते की ज्यांच्यावर पूर्वी उपचार झाले आहेत ते देखील या दिवशी दरबारात, पुन्हा येतात. त्यांच्या शरीरात आणि आवाजात सापाचा आत्मा दिसून येतो. हे पाहून काही जण आश्चर्यचकित होतात, तर काही जण आदराने हात जोडून बघत असतात. त्यामुळे आजच्या काळातही नागराजचा दरबार लासुडिया परिहार गावाचा एक खास ओळख आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच आमचा अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
