मातृदिन का साजरा केला जातो? ही अनोखी गोष्ट आजही अनेकांना माहीत नाही!
प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी, जगभरात मातृदिवस साजरा केला जातो. यामागे देखील एक कथा आहे, याबद्दल आज आपण माहिती जाणून घेऊयात.

प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी, जगभरात मातृदिवस साजरा केला जातो. परंतु, हे फक्त आईला भेटवस्तू देण्याचा किंवा तिचं कौतुक करण्याचा दिवस नाही. हा एक दिवस आहे ज्यामध्ये तिच्या कष्टाचा, तिच्या प्रेमाचा आणि तिच्या योगदानाचा सन्मान केला जातो. मातृदिवसाच्या मागे एक ऐतिहासिक कथा आहे, जी एका मुलीच्या स्वप्नाने आणि तिच्या अथक परिश्रमाने आकार घेतली.
मातृदिवसाची सुरुवात कशी झाली ?
मातृदिवसाची मुळे १९व्या शतकात अमेरिकेत रुजली. त्याची सुरुवात एका समाजसेविका ॲना रिव्हीज जार्विस यांच्या कामामुळे झाली. त्या ‘मदर्स डे वर्क क्लब’ नावाच्या गटाच्या माध्यमातून मातांना मुलं सांभाळण्याचं प्रशिक्षण देत होत्या. त्या काळात, स्वच्छतेच्या अभावामुळे लहान मुलांचा मृत्यूदर वाढला होता, आणि ॲना यांनी यावर उपाय शोधण्यासाठी मातांना आरोग्य व स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल शिकवले.
१९६१ मध्ये अमेरिकेत गृहयुद्ध झालं, पण त्याच दरम्यान, ॲना यांनी ‘मदर्स फ्रेंडशिप डे’ नावाचा उपक्रम सुरू केला. या उपक्रमात युद्धात जखमी झालेल्या सैनिकांच्या मातांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यात मैत्री निर्माण केली.
ॲना यांची मुलगी ॲना जार्विस, आपल्या आईच्या कार्याने प्रेरित होऊन, मातांची कदर करण्यासाठी एक खास दिवस तयार करण्याच्या विचारात होती. तिच्या आईच्या मृत्यूनंतर, तिने १९०८ मध्ये वेस्ट व्हर्जिनियातल्या एका चर्चमध्ये पहिला मातृदिवस साजरा केला. त्या दिवशी, तिच्या आईच्या स्मरणार्थ ५०० पांढरी कार्नेशन फुलं वाटली गेली.
मातृदिवसाचा राष्ट्रीय सण कसा झाला ?
अमेरिकेतील व्यापारी जॉन वनामेकर यांच्या सहकार्याने, हा कार्यक्रम यशस्वी झाला. आणि १९१४ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिवस म्हणून जाहीर केला.
भारतामध्ये मातृदिवस का साजरा केला जातो ?
भारतातही आजकाल मातृदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत मातेला नेहमीच उच्च स्थान मिळालं आहे. प्राचीन काळापासून देवी दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांना मातृशक्तीचं रूप मानलं जातं. मात्र, भारतातील शहरांमध्ये मातृदिवस साजरा होतो, गावांमध्ये या सणाची कमतरता आहे.
जसजसा मातृदिवस लोकप्रिय झाला, तसतसा त्याचं व्यापारीकरणही वाढलं. फुलं, भेटवस्तू, कार्ड्स आणि इतर वस्तू विकणार्या कंपन्या व्यवसायिक दृष्ट्या मातृदिवसाचा उपयोग करू लागल्या. या वाणिज्यिकरणामुळे ॲना जार्विस दुःखी झाल्या. त्यांना वाटायचं की हा दिवस फक्त एक व्यापारिक सण बनू नये, तर तो आईच्या प्रेमाचं आणि त्यागाचं प्रकट करणारा सच्चा दिवस असावा.
