मुलांचं नामकरण आणि महिला कमावते लाखो रुपये, तिच्या घराबाहेर का लागते आई – वडिलांची रांग?
बाळाचं नाव खास आणि हटके असावं असं प्रत्येकाची इच्छा असते... त्यामुळे आई - वडील बाळाचं नाव ठेवण्यासाठी खूप विचार करतात. पण सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एक अशी महिला आहे जी, मुलांच्या नामकरणासाठी लाखो रुपये घेते... आतापर्यंत तिने 500 पेक्षा अधिक बाळांना खास नाव दिलं आहे.

घरात नव्या बाळाचं आगमन झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं. बाळ जन्माला यायच्या आधी चर्चा असते ती म्हणजे मुलगा असेल तर काय नाव ठेवायचं आणि मुलगी असेल तर काय नाव ठेवायचं… भारतात, बाळाचं नाव ठेवणं ही नेहमीच कुटुंबातील एक पारंपारिक बाब मानली गेली आहे. आजी – आजोबा किंवा पालक बहुतेकदा एकत्रितपणे मुलाचे नाव ठरवतात. ज्यामध्ये धर्म, ज्योतिष आणि चालीरीती देखील मोठी भूमिका बजावतात, परंतु अमेरिकेतील एका महिलेने हे काम तिच्या उत्पन्नाचं साधन बनवलं आहे.
सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहणारी टेलर हम्फ्री नावाची महिला मुलांचे नाव सुचवते आणि त्यासाठी लाखो रुपये देखील घेते. तिचं वैशिष्ट्य म्हणजे अद्वितीय, विशिष्ट आणि संस्मरणीय नावं सुचवणं. म्हणूनच श्रीमंत कुटुंबातील आई – वडील बाळाला खास नाव देण्यासाठी तिच्याकडे येतात.
100 डॉलरने सुरु केला व्यवसाय
न्यू यॉर्क पोस्टमधील एका वृत्तानुसार, टेलरने हे काम 2018 मध्ये सुरू केलं. त्यावेळी ती फक्त 100 डॉलर्स (8,००० रुपये) मध्ये नावं सुचवत असे. त्यानंतर एका पार्टीतील उद्योजकांसोबत तिचं बोलणं झालं, तेव्हा उद्योजकांनी महिलेला तिचे दर वाढवण्यास सांगितले. प्रसिद्ध न्यू यॉर्कर मासिकात टेलरची कथा प्रकाशित झाल्यानंतर, तिच्याकडे कामाचा पूर आला. काही वेळातच, तिचा छोटासा उपक्रम मोठ्या व्यवसायात रूपांतरित झाला.
आता नवजात बालकांना खास नाव सुचवण्यासाठी टेलर 17 हजार रुपयांपासून 27 लाख रुपयांपर्यंत मानधन घेते… मानधनानुसार महिला नाव सुचवते… जर कोणी लहान पॅकेज घेत असेल तर टेलर ईमेलद्वारे काही नावे सुचवते. पण जे मोठे पॅकेज घेतात त्यांच्यासाठी टेलर माहिती गोळा करते. ती कुटुंबाच्या मूळ देशाबद्दल, त्यांच्या परंपरांबद्दल, त्यांच्या इच्छांबद्दल विचारून बाळाचं नाव ठरवते…
जर आई – वडिलांची नावावरून भांडण झाल्यास टेलर यांनी एक नाव सुचवण्यास देखील मदत करते. आतापर्यंत टेलर हिने 500 पेक्षा अधिक मुलांसाठी नावे सुचवली आहे. सोशल मीडियावर देखील तिला असंख्य लोक फॉलो करतात… टेलर म्हणते, नाव फक्त बोलण्यासाठी नसतं… नावच पुढे जाऊन मुलाची ओळख बनते. त्यामुळे विचार करुन खास नावची निवड करण्यास मी आई – वडिलांची मदत करत असं देखील महिला म्हणाली.
