‘ताबडतोब हजर व्हा’, निर्मला सीतारामन यांचं इन्फोसिसच्या सीईओना समन्स

FM Nirmala Sitharaman | काही दिवसांपूर्वीच निर्मला सीतारामन यांनी पोर्टलवरील तांत्रिक बिघाड येत्या दोन ते तीन आठवड्यात दुरुस्त होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, आता त्यांनी थेट इन्फोसिसच्या सीईओनाच धारेवर धरल्याने पुढे काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

‘ताबडतोब हजर व्हा’, निर्मला सीतारामन यांचं इन्फोसिसच्या सीईओना समन्स
निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री

नवी दिल्ली: आयकर भरण्यासाठी लाँच करण्यात आलेल्या नव्या पोर्टलवरील तांत्रिक बिघाडांचे शुक्लकाष्ठ काही केल्या पाठ सोडायला तयार नाही. त्यामुळे करदात्यांना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. इन्फोसिस कंपनीकडून हे Income Tax पोर्टल तयार करण्यात आले आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने वारंवार सूचना देऊनही इन्फोसिसला या पोर्टवरील फारशा तांत्रिक अडचणी दूर करता आलेल्या नाहीत.

त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या संतापाचा पारा चांगलाच चढला आहे. त्यांनी इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सलील पारेख यांना समन्स बजावत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सोमवारी सलील पारेख यांना निर्मला सीतारामन यांच्यासमोर हजर व्हावे लागणार आहे.

काही दिवसांपूर्वीच निर्मला सीतारामन यांनी पोर्टलवरील तांत्रिक बिघाड येत्या दोन ते तीन आठवड्यात दुरुस्त होतील, असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, आता त्यांनी थेट इन्फोसिसच्या सीईओनाच धारेवर धरल्याने पुढे काय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
यापूर्वी इन्फोसिस कंपनीने ऑगस्ट महिन्यापासून Income Tax पोर्टल व्यवस्थित कार्यरत होईल, असे म्हटले होते. मात्र, आता पंधरवडा उलटूनही या पोर्टलमधील तांत्रिक बिघाड काही केल्या संपायचे नाव घेत नाहीत. परिणामी करदात्यांना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने आयकर परतावा (Income Tax Return) आणि फॉर्म 16 भरण्याची अंतिम मुदत पुढे ढकलली होती.

Income Tax पोर्टल तयार करण्यासाठी केंद्र सरकारने इन्फोसिस कंपनीला 165 कोटी रुपये दिले होते. जानेवारी 2019 ते जून 2021 या काळात इन्फोसिस कंपनीला 164.5 कोटी रुपये अदा केले. पोर्टल तयार करण्याचे कंत्राट इन्फोसिसला जाहीर निवीदा प्रक्रियेच्या माध्यमातून मिळाले. पब्लिक प्रोक्योरमेंट पोर्टलच्या माध्यमातून (CPPP) कंत्राटाची प्रक्रिया पार पडली, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली होती.

7 जूनला सुरु झाले होते पोर्टल

www.incometax.gov.in हे पोर्टल 7 जूनपासून सुरु झाले होते. कर भरतानाची प्रक्रिया सुलभ व्हावी, या उद्देशाने हे पोर्टल तयार करण्यात आले होते. मात्र, या नव्या पोर्टलचा वापर करताना करदात्यांना अनेक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले होते. या पोर्टलवरील अनेक सुविधा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. त्याठिकाणी केवळ COMING SOON असा मेसेज दाखवला जात आहे.

संबंधित बातम्या:

Income Tax लाँच करणार नवीन पोर्टल, करदात्यांसाठी कोणती सुविधा?

Income Tax Portal: इन्फोसिसने तयार केलेल्या नव्या इन्कम टॅक्स पोर्टलमध्ये तांत्रिक त्रुटी; अर्थमंत्रालयाने बोलावली बैठक

Income Tax E-Filing Portal: इन्फोसिस आणि अर्थमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक; निर्मला सीतारामन म्हणाल्या…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI