मुंबई : राजीव पाटील यांची बँक एफडी (FD) मॅच्युअर होताच त्यांनी एफडीतील पैसे काढले आणि पी2पी म्हणजेच पीअर टू पीअर (Peer to peer) लेंडिंग प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक (Investment) केली. कर्ज प्लॅटफॉर्मवरील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा इतर कोणत्याही गुंतवणूक योजनेपेक्षा जास्त म्हणजे 16 टक्के आहे. तीन महिने सर्वकाही व्यवस्थित होतं. मात्र, चौथ्या महिन्यापासून डिफॉल्ट कर्जदारांची संख्या वाढली त्यामुळे परतावा मिळत नव्हता. त्यामुळे आता राजीव यांना 16 टक्के परताव्याऐवजी मुद्दल कशी परत मिळेल याची चिंता वाटू लागली आहे. P2P प्लॅटफॉर्म गुंतवणूकदारांना उच्च परतावा देण्याचे आमिष दाखवून निधी उभारतात. ज्या लोकांना बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळू शकत नाही अशा लोकांना या निधीतून पुढे कर्ज दिले जाते. कमी क्रेडिट रेटिंग असलेले लोक अशा प्लॅटफॉर्मवर कर्ज घेतात. प्रत्येक P2P प्लॅटफॉर्मवर कर्जदाराचे प्रोफाइल तयार करण्यात येते. कर्जाची परतफेड करण्याच्या क्षमतेवर कर्ज घेणाऱ्यांना श्रेणी दिली जाते. ज्या कर्जदाराची प्रोफाइल कमकुवत आहे त्याला जास्त दरानं कर्ज मिळते. जास्त परताव्याच्या आमिषानं कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या उमदेवारांना कर्ज दिले जाते. मग अशा लोकांकडून कर्ज बुडवली जातात.