RuPay आणि Visa Card मधील फरक काय? तुमच्यासाठी सर्वोत्तम कोणतं?
RuPay Card vs Visa Card : तुमच्या पाकीटात असलेलं कार्ड हे रुपे किवा व्हीजाचं असेल. मात्र त्याचे फायदे काय? तुमच्यासाठी दोघांपैकी कोणतं कार्ड हे सर्वात जास्त फायदेशीर आहे? दोन्ही कार्डमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या.

सध्याचा ऑनलाईनचा जमाना आहे. बहुतांश गोष्टी आणि बरेच व्यवहार हे ऑनलाईन केले जातात. बहुतांश जणांचा ऑनलाईन व्यवहार करण्याकडे कल आहे. ऑनलाईन व्यवहारामुळे रोख व्यवहारात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ऑनलाईन व्यवहारासाठी नेटबँकिंग आणि यूपीआयचा वापर केला जातो.तसेच अनेक जण कार्डद्वारेही कॅशलेस व्यवहार करतात. तुमच्याकडे असलेल्या कार्डवर रुपे आणि व्हीसा असं मोठ्या आणि ठळक शब्दात लिहिलेलं असेल. मात्र या व्हीसा आणि रुपे कार्डात नेमका फरक काय? त्याचा फायदा काय? हे अनेकांना माहिती नसतं. आपण या दोघांमधील नेमका फरक जाणून घेऊयात.
रुपे कार्ड
एनपीसीआय अर्थात नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 2012 साली रुपे कॉर्ड लॉन्च केलं होतं. रुपे हे भारतीय अर्थात स्वदेशी कार्ड आहे. रुपे भारतीय पेमेंट नेटवर्कसह कनेक्ट असलेलं कार्ड आहे. हे कार्ड संपूर्ण भारतात वापरु शकतो. भारतात रुपे कार्डाचा वापर व्हीजा आणि मास्टर कार्डप्रमाणे करता येतो. स्वदेशी कार्ड असल्याने व्हीजा आणि मास्टर कार्डच्या तुलनेत रुपे कार्डद्वारे वेगवान व्यवहार करता येतं.
व्हीसा कार्ड
तुमच्याकडे असलेल्या डेबिट कार्डवर व्हीजा असं लिहिलेलं असेल, तर व्हीजा नेटवर्कचं कार्ड आहे. कंपनी हे कार्ड इतर आर्थित संस्थांसह पार्टनरशिपद्वारे जारी करते. व्हीजा जगातील सर्वात मोठं पेमेंट नेटवर्क आहे. व्हीजा कार्डचे अनेक प्रकार आहेत. क्लासिक, गोल्ड, पॅल्टिनम, सिग्नेचर आणि इन्फाइनाइट असे व्हीजाचे प्रकार आहेत. प्रत्येक कार्डनुसार मिळणाऱ्या सेवा-सुविधा या वेगवेगळ्या आहेत.
दोघांमधील नेमका फरक काय?
रुपे कार्ड स्वदेशी असल्याने भारतात प्रत्येक ठिकाणी ते मान्य आहे. इतर कार्डच्या तुलने रुपेद्वारे व्यवहार वेगाने होतं. मात्र आंतरराष्ट्रीय वेबसाईटवर रुपे कार्डचा वापर करता येत नाही. उलट व्हीजा कार्ड जगभरात कुठेही वापरता येतं.रुपे कार्ड स्वदेशी असल्याने भारतात इतर कार्डच्या तुलनेत त्याचं शुल्क कमी आहे. तर व्हीजा कार्डसाठी रुपेच्या तुलनेत अधिक पैसे मोजावे लागतात. रुपे कार्ड भारतातील ग्रामीण भागाचा विचार करुन सुरु करण्यात आलं आहे. तर व्हीसा कार्डचा वापर टियर 1 आणि टियर 2 शहरात सर्वाधिक होतो.
तुमच्यासाठी सर्वोत्तम कार्ड कोणतं?
रुपे आणि व्हीजा या दोन्ही कार्डचे वेगवेगळे फायदे आहेत. तुम्ही आंतरराष्ट्रीय प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी व्हीजा कार्ड सर्वोत्तम आहे. तसेच देशांतर्गत वापरासाठी रुपे कार्ड फायदेशीर आहे. तसेच तुम्ही कार्ड कसं वापरता? यावरही त्या त्या कार्डचे फायदे आहेत.
