अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा

अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा

| Updated on: Nov 22, 2026 | 2:50 PM

आनंदराज आंबेडकरांनी जालन्यात अजित पवारांबाबत केलेल्या असंवेदनशील वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. पाणीटंचाईवरून केलेल्या टिप्पणीनंतर त्यांनी सारवासारव करत उपरोधिक उल्लेख असल्याचे म्हटले. मात्र, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी स्व. अजित दादा पवारांबाबतच्या या विधानाचा तीव्र निषेध करत, माफी न मागितल्यास विरोध करण्याचा इशारा दिला आहे.

जालना येथे रिपब्लिकन सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना आनंदराज आंबेडकरांनी अजित पवारांबाबत एक असंवेदनशील वक्तव्य केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “जिथे पाऊसच पडत नाही तिथे काय अजितदादांना आणायचं का,” असे वक्तव्य त्यांनी केले होते. भाषणादरम्यान ते भान विसरल्याचे बोलले जात आहे. या वक्तव्यावर नंतर आनंदराज आंबेडकरांनी सारवासारव करत स्पष्टीकरण दिले. त्यांचा उल्लेख उपरोधिकपणे होता असे त्यांनी सांगितले. “या देशात शेतकऱ्यांचा विचार करणारे राज्यकर्ते नाहीत, मूर्खपणा करणारे राज्यकर्ते आहेत. पाणी आडवा आणि पाणी जिरवा म्हणतात, पण जिथे पाऊसच पडत नाही तिथे काय अजित दादांना आणून तलाव भरायचे आणि पाणी जिरवायचे,” असे ते म्हणाले होते.

हे विधान त्यांनी अजित पवारांच्या पाण्याच्या संदर्भातील पूर्वीच्या वक्तव्याला उद्देशून केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी आनंदराज आंबेडकरांच्या विधानाचा तीव्र निषेध केला. चव्हाण यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “आनंदराज आंबेडकर यांनी स्व. अजित दादा पवार यांच्यावरती केलेल्या विधानाचा जाहीर निषेध करतो. हयात नसलेल्या व्यक्तीवरती बोलून त्यांनी अकलेची दिवाळखोरी दाखवलेली आहे. फक्त आंबेडकर आडनाव असलं म्हणजे अक्कल असतेच असं नाही.” त्यांनी आनंदराज आंबेडकरांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा संविधानिक पद्धतीने त्यांना भेटतील तिथे विरोध करू, असा इशाराही दिला आहे.

Published on: Nov 22, 2026 2:49 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us