सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता झाली अन् केजरीवालांच्या अश्रूंचा बांध फुटला
दारू घोटाळा प्रकरणी दिल्लीच्या राऊज अवेन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांची निर्दोष सुटका केली असून, सीबीआयला फटकारले आहे. ठोस पुराव्याअभावी ही मुक्तता झाली. केजरीवाल यांच्यासह 23 आरोपींची सुटका झाल्याने आप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सीबीआयने आता उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्लीच्या कथित दारू घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राऊज अवेन्यू कोर्टाने निर्दोष सुटका केली आहे. या प्रकरणात न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयला फटकारले आहे. आरोप सिद्ध करण्यासाठी सीबीआयने कोणतेही ठोस पुरावे सादर केले नाहीत, तसेच आरोपपत्रात गंभीर कमतरता असल्याचे न्यायालयाने नमूद केले. केजरीवाल किंवा इतर आरोपींविरोधात प्राथमिक पुरावा नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. पुरावे नसताना आरोप केल्याने लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होतो, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.
या निकालानंतर अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर झाले. मुख्यमंत्री असताना त्यांना याच आरोपांमुळे अटक करण्यात आली होती. कोर्टाने सीबीआयला त्यांच्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदिया आणि इतर 21 आरोपींचीही निर्दोष सुटका झाली. यानंतर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. सुनीता केजरीवाल यांनी “सत्याचा नेहमीच विजय होतो” असे सूचक ट्विट केले आहे. दरम्यान, सीबीआयने या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.
