भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट, अजित गव्हाणेंचा गंभीर आरोप!
महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघातून १५ हजार मतदारांची नावे मतदार यादीतून विभागल्याचा गंभीर आरोप केला आहे. मतदारांचे पत्ते बदलल्याचा आणि मृतांचे बोगस अर्ज भरल्याचा दावा त्यांनी केला. गव्हाणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून, या प्रकारामुळे निवडणुकीतील गैरव्यवहारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
भोसरी विधानसभा मतदारसंघात 15 हजार मतदारांची नावे मतदार यादीतून विभागल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी केला आहे. या प्रकारामुळे मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गव्हाणे यांच्या आरोपानुसार, अनेक मतदारांचे पत्ते बदलण्यात आले आहेत, तर मृत व्यक्तींचेही बोगस अर्ज (फॉर्म ८-अ) भरण्यात आले आहेत. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी अनेक नागरिक मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्यांना सांगण्यात आले की त्यांची नावे मतदार यादीत नाहीत, ती दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट किंवा ट्रान्सफर झाली आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, या मतदारांनी स्वतःहून आपली नावे बदली करण्यासाठी कोणताही अर्ज केला नव्हता. असे असतानाही त्यांची नावे महाराष्ट्रातील अन्य विधानसभा मतदारसंघांमध्ये स्थलांतरित करण्यात आली. अजित गव्हाणे यांनी केलेल्या पाहणीत सुमारे 15 हजार नावे अशा प्रकारे शिफ्ट झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर, काही नावे भोसरी मतदारसंघात इतर ठिकाणाहून आली असल्याचाही त्यांचा दावा आहे. मृत व्यक्तींच्या नावावर फॉर्म ८-अ भरला जाणे ही बाब अत्यंत संशयास्पद असून, ज्या व्यक्ती हयात नाहीत, त्यांचे अर्ज कसे स्वीकारले जातात, असा सवाल गव्हाणे यांनी उपस्थित केला आहे. टीव्ही नाईन मराठीसाठी रणजित जाधव, पिंपरी चिंचवड.
