Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या समस्यांमुळे तब्बल 20 कंपन्या स्थलांतर करण्याच्या तयारीत असल्याचा दावा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला आहे. या कंपन्यांमध्ये सुमारे दोन हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत असल्याने त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पवार यांनी व्यक्त केली आहे. या मुद्द्यावर ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनीही संसदेत आवाज उठवत कंपन्यांच्या स्थलांतरासंदर्भातील आकडेवारी मांडली आहे.

शरद पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधले. चाकण एमआयडीसीमधील कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज आणि रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतराचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला. उद्योग राज्याबाहेर किंवा अन्य ठिकाणी जाऊ नयेत, रोजगाराच्या संधी टिकून राहाव्यात आणि महाराष्ट्राची औद्योगिक ताकद कायम राहावी, यासाठी राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे पवार यांनी म्हटले.
दरम्यान, या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ज्या कंपन्या अद्याप सुरूच झालेल्या नाहीत, त्यांनी स्थलांतर केले असे म्हणता येणार नाही, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली. त्यामुळे चाकणमधील कंपन्यांच्या स्थलांतराच्या मुद्द्यावर पवार आणि फडणवीस यांच्या दाव्यांमध्ये वेगवेगळे चित्र समोर आले आहे.
शरद पवार यांनी चाकण, तळेगाव आणि राज्यातील इतर औद्योगिक वसाहतींमधील पायाभूत सुविधांचा युद्धपातळीवर विकास करण्याची मागणी केली आहे. खड्डे, खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न तातडीने सोडवावा, तसेच एमआयडीसी, पीएमआरडीए, पीडब्ल्यूडी आणि एनएचएआय यांच्यात समन्वय साधून एकात्मिक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
उद्योजकांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेऊन विशेष ‘एक खिडकी’ यंत्रणा उभारण्याची सूचनाही पवार यांनी केली आहे. उद्योगांना आवश्यक सुविधा वेळेत मिळाल्या तर कंपन्यांचे संभाव्य स्थलांतर रोखता येईल आणि रोजगाराच्या संधी कायम ठेवता येतील, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, शरद पवार पुढील दोन ते तीन दिवसांत चाकण एमआयडीसीला भेट देणार आहेत. यावेळी ते उद्योजकांशी संवाद साधून वाहतूक कोंडी, रस्ते, पाणी, वीज आणि इतर पायाभूत सुविधांबाबतच्या समस्या जाणून घेणार आहेत. चाकणसोबतच राज्यातील काही उद्योगधंदे बंद होण्याच्या किंवा स्थलांतराच्या स्थितीत असल्याचा दावा करत पवार यांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
त्यामुळे चाकण एमआयडीसीतील कंपन्यांच्या स्थलांतराचा मुद्दा आता राजकीय आणि औद्योगिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. शरद पवारांच्या दाव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे या प्रकरणात नेमकी वस्तुस्थिती काय आहे आणि सरकारकडून पुढे कोणत्या उपाययोजना केल्या जातात, याकडे आता लक्ष लागले आहे.