tv9 Marathi Special Report : Abhijeet Dipke : मी पुन्हा येईन म्हणत अभिजित दिपकेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना डिवचलं; CJPच्या आंदोलनात नेमकं काय घडलं?
मुंबईतील शिवाजी पार्कात सीजेपीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केले. अभिजीत दिपके यांनी फडणवीसांना "मी पुन्हा येईन" म्हणत डिवचले. या आंदोलनात शबाना आझमी, विशाल ददलानी यांसारखे बॉलीवूड कलाकार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनीही पाठिंबा दिला, तर भाजपने याला अराजकतेचे व्याकरण म्हटले.
मुंबईतील शिवाजी पार्कात कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मोठे आंदोलन केले. जवळपास साडेतीन तास चाललेल्या या आंदोलनात “गद्दार ग्यानू मस्ट गो” अशा घोषणा देण्यात आल्या. आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके यांनी या निमित्ताने भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. फडणवीसांच्या “मी पुन्हा येईन” या वक्तव्याचा संदर्भ देत, दिपकेंनी जेलमधून बाहेर आल्यावरही तेच बोलणार असल्याचे सांगितले आणि एकप्रकारे त्यांना डिवचले.
या आंदोलनात बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि संगीतकार विशाल ददलानी यांनीही सहभाग घेतला. मतदार यादीतून आपली नावे कापल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. आमदार महेश सावंत यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वतीने सीजेपीला कायमस्वरूपी पाठिंबा दर्शवला. एका बाजूला सीजेपीचे हे आंदोलन सुरू असतानाच, दुसरीकडे मंत्रालयासमोर जेन नेक्स्ट या संघटनेने सीजेपीच्या आंदोलनाला विरोध करत दिपके राजकारण करत असल्याचा आरोप केला. एकनाथ शिंदे यांनीही या आंदोलनामुळे फेक नरेटिव्ह पसरवला जात असल्याची टीका केली.
