CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
नागपूरच्या मारबत उत्सवात सहभागी होत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळ आणि महाराष्ट्राच्या सर्व इडापिडा टळाव्यात अशी इच्छा व्यक्त केली. त्यांनी मारबतला जागतिक स्तरावर नेण्याचे महानगरपालिकेचे प्रयत्न कौतुकास्पद ठरवले. तसेच, एमपीएससी आंदोलनावर सरकारची सकारात्मक भूमिका आणि मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
नागपूर येथे आयोजित पारंपरिक मारबत उत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी बोलताना, जवळपास दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवातून समाजातील इडापिडा जाळल्या जातात, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या जीवनातील सर्व इडापिडा दूर व्हाव्यात, विशेषतः दुष्काळाची पिडा टळावी, ही आपली इच्छा असल्याचे फडणवीस म्हणाले. नागपूर महानगरपालिकेने मारबतला जागतिक महोत्सव म्हणून पुढे आणण्यासाठी परदेशी पाहुण्यांना आणि कौन्सिल जनरलना आमंत्रित केल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले. यामुळे मारबतला एक जागतिक ओळख मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एमपीएससी संदर्भात सुरू असलेल्या आंदोलनावरही त्यांनी भाष्य केले. सरकार सर्व विषयांवर सकारात्मक भूमिका घेत असून, परीक्षेतील गडबड करणाऱ्यांना जेरबंद केले आहे. तसेच, भविष्यात पारदर्शक परीक्षा पद्धती आणणार असल्याचे त्यांनी सांगितले. काही लोक क्रेडिट घेण्यासाठी किंवा राजकारण करण्यासाठी याचा वापर करत असल्याची टीका त्यांनी केली. मनोज जरांगे पाटील यांच्या तुम्ही सुट्ट व्हा, मुंबईत चला या विधानावर, छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.
