शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन…
दुष्काळसदृश परिस्थिती आणि पावसाच्या दडीमुळे उभी पिके करपलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ज्या भागांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासन आणि मुख्य सचिवांना पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
पावसाने दडी मारल्यामुळे ज्या भागांमध्ये उभी पिके करपून गेली आहेत, त्या ठिकाणी अधिकारी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर नियमांनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत आणि नुकसानभरपाई देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपाचा मुद्दाही चर्चेत आहे. याबाबत बोलताना बावनकुळे यांनी प्रमाणपत्र वाटपासाठी यापूर्वीही विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. शासनाने यासाठी पुढाकार घेतला असून, निश्चित नियमावलीनुसार प्रमाणपत्र वाटपासाठी कॅम्प घेणे हे सरकारचे धोरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पिकांच्या नुकसानीचे प्रत्यक्ष सर्वेक्षण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत शासनाकडून निर्णय घेतला जाणार असल्याने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.