भररस्त्यात दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच… मद्यधुंध तरुणाचा धक्कादायक प्रकार
संभाजीनगरात एका मद्यधुंद तरुणाने भररस्त्यात स्वतःची दुचाकी पेटवून दिली. रांजणगाव शेणपुंजी येथील दत्ता नगर फाट्यावर ही धक्कादायक घटना घडली. दुचाकी पेटवून तरुण रस्त्यावर झोपल्याने अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
छत्रपती संभाजीनगर येथे एका मद्यधुंद तरुणाने भररस्त्यात आपल्याच दुचाकीला आग लावून गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रांजणगाव शेणपुंजी येथील दत्ता नगर फाट्यावर हा प्रकार घडला, ज्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण दारूच्या नशेत होता. त्याने अचानकपणे आपली दुचाकी रस्त्याच्या मध्यभागी आणून तिला पेटवून दिले. दुचाकी धडधडत पेटत असताना, तरुण रस्त्यावरच झोपला. त्याच्या या अविचारी कृत्यामुळे जवळपास अर्धा तास मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही केली. त्यांनी मद्यधुंद तरुणाला रस्त्यावरून बाजूला केले आणि अग्निशमन दलाच्या मदतीने पेटलेल्या दुचाकीची आग विझवली. पोलिसांनी केलेल्या वेळेवर कारवाईमुळे पुढील अनर्थ टळला आणि वाहतूक पूर्ववत सुरू झाली.
