मोठी बातमी! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला? श्रीकांत शिंदेंसह ओमराजेदेखील… राजकारणातील हालचाली वाढल्या
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. या विस्तारात राज्यातील काही नेत्यांना लॉटरी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. यात अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झालेले ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात आहे. या विस्तारात राज्यातील काही नेत्यांना लॉटरी लागणार असल्याची चर्चा सुरू आहे. यात अलीकडेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झालेले ओमराजे निंबाळकर आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद मिळणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज (१ जुलै) रोजी दुपारीच दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळातील विस्ताराच्या कामासंदर्भात एकनाथ शिंदेंचा हा दौरा असू शकतो. सुरुवातीला मंत्री पद श्रीकांत शिंदे की ओमराजे कोणाला मिळेल अशी चर्चा होती, मात्र आता दोघांना मंत्रिपद मिळेल अशा चर्चा आहेत. एकनाथ शिंदेंच्या आजच्या दिल्ली दौऱ्याच्या माहितीवरून पुन्हा या चर्चांनी जोर धरला आहे.
काही दिवसांपूर्वीच खासदार ओमराजेंना मंत्रिपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला, यावर बोलताना ओमराजे म्हणाले की, मंत्री होणे ही माझी प्राथमिकता नाही, अतिशय प्रामाणिकपणे हे मी कबूल करू इच्छितो. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी, मतदारसंघाच्या विकासासाठी आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी काम करायचे आहे.
