इकडे फडणवीसांचं आमदारांना प्रपोजल, तिकडे ठाकरेंच्या नगराध्यक्षा थेट महाजनांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं?
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना जळगावात घडलेल्या एका भेटीने चर्चांना उधाण आले आहे. मंत्री गिरीश महाजन हे आज जळगाव दौऱ्यावर असून ते भाजप कार्यालयात उपस्थित होते.
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना जळगावात घडलेल्या एका भेटीने चर्चांना उधाण आले आहे. मंत्री गिरीश महाजन हे आज जळगाव दौऱ्यावर असून ते भाजप कार्यालयात उपस्थित होते. याचवेळी यावल नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्षा छाया पाटील आणि त्यांचे पती अतुल पाटील यांनी गिरीश महाजन यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान अतुल पाटील आणि गिरीश महाजन यांच्यात जवळपास 1 तास बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली. मात्र, या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नसल्याचे छाया पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
“आम्ही वैयक्तिक कामानिमित्त आलो होतो. हॉस्पिटलच्या कामासाठी भेट घेतली. विधान परिषदेच्या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच पाठिंबा देणार आहोत,” असे छाया पाटील यांनी सांगितले.
तर अतुल पाटील यांनीही “आम्ही 100 टक्के महाविकास आघाडीच्या उमेदवारासोबत आहोत,” अशी भूमिका स्पष्ट केली.
