गंभीर आरोप करत लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून मनोज जरांगेंवर निशाणा साधला आहे. जरांगे हा केवळ मुखवटा असून काही मराठा नेते आपले हेतू साधत असल्याचा आरोप हाकेंनी केला. हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण झाल्याचे सांगत, या जीआरमुळे ओबीसी आरक्षणाचा गळा घोटला जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. जरांगे हे केवळ एक मुखवटा असून, काही क्रूर मराठा राजकीय नेते त्यांच्या आडून आपले हेतू साध्य करत असल्याचा आरोप हाकेंनी पत्रात केला आहे. ओबीसींना धक्का न लावता इथून पुढे मतदान करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
आपल्या पत्रात लक्ष्मण हाकेंनी पंचायत राज निवडणुकांचा उल्लेख केला. गेल्या सात वर्षांपासून या निवडणुका झाल्या नव्हत्या. सर्वोच्च न्यायालयाने 2022 पूर्वीचे आरक्षण ग्राह्य धरून निवडणुका घेण्याचा निर्णय दिला होता, ज्यामुळे अनेक ओबीसी कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद सदस्य ते महापौर पदापर्यंत पोहोचण्याची आशा होती. मात्र, जरांगे यांनी मुंबई गाठत सरकारच्या मानगुटीवर बसून हैदराबाद गॅझेटचा जीआर मंजूर करून घेतल्याचे हाकेंनी म्हटले आहे. या जीआरमुळे बोगस दाखले काढून मराठा आरक्षणावर आधीच अनधिकृत ताबा मिळवणाऱ्या सरंजामी मराठा टोळीला बळ मिळाले आहे. हा जीआर ओबीसी आरक्षणाचा गळा घोटणार असल्याचा दावा लक्ष्मण हाकेंनी केला आहे.
