पोलिसांनी अडवलंच तर… मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणाऱ्या निर्णायक आंदोलनाची सविस्तर रणनीती स्पष्ट केली आहे. त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन करत, अडथळे आल्यास संयमाने सामोरे जाण्याचे आणि पर्यायी मार्ग शोधण्याचे निर्देश दिले. फडणवीस सरकार मराठा मतदारांचा रोष ओढवून घेणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणासाठी मुंबईत होणाऱ्या निर्णायक आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला मार्गदर्शन केले आहे. मुंबईकडे कूच करताना कोणत्याही परिस्थितीत शांतता भंग न करण्याचं आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन त्यांनी केले. आंदोलनाला अडथळे आणल्यास बॅरिकेड्स न ओलांडता रस्त्यावर झोपून किंवा पर्यायी मार्ग शोधून पुढे जाण्याच्या सूचना जरांगे पाटलांनी दिल्या. या आंदोलनाला सरकार अडवणार नाही, असा विश्वास जरांगे पाटलांनी व्यक्त केला.
विशेषतः देवेंद्र फडणवीस मराठा मतांचा रोष ओढवून घेणार नाहीत, असे ते म्हणाले. कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटपात असलेल्या अडचणींवरही त्यांनी प्रकाश टाकला आणि सरकारला धारेवर धरले. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावरही त्यांनी लक्ष वेधले. मराठा समाजाला ही अंतिम लढाई असून, प्रत्येकाने यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. ही लढाई शांततेत आणि डोक्याने हाताळण्याचे आवाहन जरांगे पाटलांनी केले आहे.
