दाऊद इब्राहिमच्या जुन्या वास्तव्यावर हातोडा! भेंडी बाजारातील मुसाफिरखाना इमारतीवर पालिकेची मोठी कारवाई
मुंबई महानगरपालिकेने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित भेंडी बाजारातील मुसाफिरखाना इमारतीवर कारवाई सुरू केली आहे. ही इमारत सी-वन श्रेणीतील धोकादायक असल्याने पालिकेने हा निर्णय घेतला आहे. कारवाईवेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, तळमजल्यावरील प्रार्थनास्थळाला धक्का न लावता कारवाई केली जात आहे.
मुंबईतील भेंडी बाजार परिसरातील मुसाफिरखाना इमारतीवर मुंबई महानगरपालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे जुने वास्तव्य या इमारतीत होते. ही इमारत अत्यंत जीर्ण झाल्याने आणि सी-वन श्रेणीतील धोकादायक घोषित करण्यात आल्याने पालिकेने ती जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासूनच या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या प्रार्थनास्थळाला धक्का न लावता कारवाई सुरू करण्यात आली आहे. स्थानिक रहिवाशांनी या प्रार्थनास्थळाच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली होती, त्यामुळे विपरीत बाजूने कारवाई केली जात आहे. गेल्या सहा वर्षांपासून पालिकेने या इमारतीला नोटीस दिल्या होत्या. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे.
