मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त

मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त

| Updated on: Jun 10, 2026 | 12:36 PM

मुंबईतील एका नोकरीच्या जाहिरातीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. स्थानिक मराठी उमेदवारांना डावलून विशिष्ट समाजातील उमेदवारांना प्राधान्य दिल्याचा आरोप या जाहिरातीवरून करण्यात येत आहे. सोशल मीडियावर ही जाहिरात व्हायरल झाल्यानंतर मराठी संघटना आणि स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादस्थित एका भरती एजन्सीने नोकरी शोधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नोकरी डॉट कॉम आणि लिंक्डइन या प्लॅटफॉर्मवर मुंबईतील एका वरिष्ठ पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत “Only Gujarati and Marwari Candidates Preferred” असा उल्लेख करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. संबंधित पद हे अकाउंट्स आणि फायनान्स क्षेत्राशी संबंधित असून, चार्टर्ड अकाउंटंट (CA) पदासाठी उमेदवारांची मागणी करण्यात आली आहे. या पदासाठी वार्षिक 20 ते 25 लाख रुपये वेतनाचा उल्लेखही जाहिरातीत करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

या जाहिरातीवर मराठी एकीकरण समितीने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. समितीचे प्रतिनिधी गोवर्धन देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, मुंबईत उपलब्ध असलेल्या उच्च वेतनाच्या नोकऱ्यांमध्ये स्थानिक मराठी तरुणांना संधी नाकारली जात असल्याची भावना या जाहिरातीमुळे अधिक बळकट झाली आहे. “मुंबईत नोकरी असूनही मराठी उमेदवारांना प्राधान्य न देता विशिष्ट समाजाचा उल्लेख का करण्यात आला? याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी,” अशी मागणी त्यांनी केली.

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध असलेल्या शहरांपैकी एक आहे. मात्र, अनेकदा स्थानिक तरुणांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळत नसल्याची तक्रार विविध संघटनांकडून करण्यात येते. अशा परिस्थितीत ही जाहिरात समोर आल्याने पुन्हा एकदा स्थानिक रोजगाराचा मुद्दा चर्चेत आला आहे.

दरम्यान, या जाहिरातीबाबत संबंधित कंपनी किंवा भरती एजन्सीकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसून, या प्रकरणावर पुढे काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 10, 2026 12:36 PM
Follow Us